आवासच्या आशेत उघड्यावर राहण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:17 AM2019-06-04T00:17:47+5:302019-06-04T00:20:17+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र माहूर शहरात स्वत:च्या मालकीच्या जागेवर ३४७ नागरिकांना दोन टप्प्यात घरकुल मंजूर करण्यात आले़ यापैकी २५ लाभार्थ्यांना ८० हजार तर ३२ लाभार्थ्यांना फक्त ४० हजारांचे अनुदान मिळाले़ उर्वरित निधीअभावी सर्वांचीच बांधकामे थांबले आहेत़ त्यामुळे भरपावसाळ्यात या लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे़
ईलियास बावानी।
श्रीक्षेत्र माहूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र माहूर शहरात स्वत:च्या मालकीच्या जागेवर ३४७ नागरिकांना दोन टप्प्यात घरकुल मंजूर करण्यात आले़ यापैकी २५ लाभार्थ्यांना ८० हजार तर ३२ लाभार्थ्यांना फक्त ४० हजारांचे अनुदान मिळाले़ उर्वरित निधीअभावी सर्वांचीच बांधकामे थांबले आहेत़ त्यामुळे भरपावसाळ्यात या लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे़
माहुरात घरकुल बांधणीसाठी अर्ज मागविण्यात आले होते़ यावेळी नगरपालिकेने कराची जोरात वसुली केली़ नागरिकांनीही मालकीच्या जागेवर घरकुल बांधता यावे यासाठी ८०० पेक्षा जास्त अर्ज सादर केले़ तर सरकारी किंवा खासगी जागेवर असलेल्या ५१८ नागरिकांनी नोंदणी केली़ ३४० नागरिकांनी आम्हाला जागा नाही, घर द्या म्हणून अर्ज केले़ अशाप्रकारे १६०० पेक्षा जास्त अर्ज न.प.कडे जमा झाले होते़ पहिल्या टप्प्यात फक्त ८२ लाभार्थ्यांची निवड झाली़ ८२ पैकी ७० लाभार्थ्यांना बांधकाम परवाने देण्यात आले तर त्यापैकी ५७ लाभार्थ्यांनी काम सुरू केले़ त्यांना प्रत्येकी ४० हजार देण्यात आले़ त्यानंतर २५ लाभार्थ्यांना आणखी ४० हजार देण्यात आले़
शहरात १६०० पेक्षा जास्त नागरिकांनी घरकुल मिळावे यासाठी अर्ज दाखल केले़ यापैकी फक्त २५ लाभार्थ्यांना प्रत्येकी ८० हजार रुपये देण्यात आले़ दुसरीकडे,राज्य सरकारने १ लक्ष रुपयापैकी केवळ ४० हजार दिले असून असून केंद्र सरकारकडून दीड लाख रुपये येणे आहे़ घरकुलासाठी ४ टप्प्यात शासनाकडून अर्ज मागविण्यात आले होते़ ६०० हून अधिक जण जागा व घर नसल्याने भाड्याने राहतात़ त्यांच्यासाठी किमान ६ एकर जागा घेऊन ६०० घरे बांधावी लागणार आहे़
घरकुल बांधकामाचे कंत्राट अकोला येथील नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्थेला देण्यात आले आहे़ या संस्थेकडून नांदेड येथे मराठवाडा समन्वयक म्हणून शेख हिरालाल नांदेड व माहूरचे प्रकल्प समन्वयक म्हणून राजू सोनकांबळे माहूर चे समन्वयक लक्ष्मीकांत कापसे यांची नियुक्ती केली आहे़
घरकुलांचे काम किती झाले याचा हिशेब ठेवण्याचे काम नियमानुसार झाले किंवा नाही याची माहिती ठेवण्यासाठी अभियंता म्हणून विशाल ढोरे यांची नेमणूक करण्यात आली असून या सर्व कामांचा आढावा मुख्याधिकारी विद्या कदम यांनी घ्यायचा आहे़ याशिवाय लेखाधिकारी वैजनाथ स्वामी यांचीही मोठी जबाबदारी आहे.
मंजूर ८२ घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येकी ४० हजारांप्रमाणे असे एकूण ३२ लक्ष ८० हजार रुपये माहूर नगरपंचायतला देण्यात आले होते़ त्यामुळे पुढील रक्कमही येईल या आशेवर मुख्याधिकारी कदम यांनी ७० लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी दिली़ त्यातील फक्त ५७ लाभार्थ्यांनीच काम सुरु केले़ त्यामुळे त्यांना प्रत्येकी ४० हजार देण्यात आले़ तर २५ लाभार्थ्यांनी काम पूर्ण केले आहे़
पहिल्या हप्त्यापोटी आलेली ३२ लाख ८० हजार रुपयांची रक्कम कामे पाहून वाटप करण्यात आली आहेत़ उर्वरीत नागरिकांनी कामे झाल्याने पुढील हप्त्याच्या रकमेची मागणी केली आहे़ त्यानंतर १७ मे रोजी म्हाडाकडे पत्र पाठवून पुढील हप्त्याची मागणी करण्यात आली आहे़या संदर्भात शासनासह म्हाडाकडे घरकुल लाभार्थ्यांच्या पुढील हप्त्यासाठी दोन वेळा पत्रव्यवहाराद्वारे मागणी केली आहे़ या संदर्भातला निधी उपलब्ध होताच लाभार्थ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. -मुख्याधिकारी विद्या कदम, माहूर ऩप़