नेटवर्कच्या त्रासाला ग्राहक वैतागले
नांदेड : बड्या कंपन्यांचे मोबाइल नेटवर्क वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार ग्राहक अनुभव घेत आहेत. फोन कट होेणे, नेटवर्क न मिळणे आदी समस्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. या कंपनीचे सिम कार्ड नको, असे ग्राहक म्हणत आहेत.
भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात
नांदेड : जिल्ह्यातील काही ठिकाणचे आठवडी बाजार बंद असल्याने, भाजीपाला विक्रेते संकटात सापडले. मागील चार महिन्यांपासून आठवडी बाजार बंद होते. या दरम्यान आर्थिक उलाढालही थांबली होती. मधल्या काळात अनलॉकमध्ये बाजारपेठा सुरू झाल्याने ग्रामीण उलाढाल वाढली होती. पुन्हा काही ठिकाणचे बाजार बंद झाल्याने भाजीपाला उत्पादकांचे हाल होत आहेत.
ग्रामीण भागात संथ गतीने लसीकरण
नांदेड : कोरोनाची दुसरी लाट अद्यापही संपली नसताना, ग्रामीण भागात लसीकरण मोहीम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रबोधन आणि मनुष्यबळ वाढून आरोग्य विभागाला काम करावे लागणार आहे. जिल्हा आरोग्य विभाग याकडे लक्ष देत नसल्याने लसीकरणाने गती घेतली नाही.
पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये चिंता
देगलूर : तालुक्यात पाऊस लांबल्याने कोवळी पिके सुकत असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येत्या एक-दोन दिवसांत पाऊस झाला नाही, तर पिके वाया जाऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
महिलेची आत्महत्या
हदगाव : कोहळी ता.हदगाव येथील स्वाती सिद्धार्थ खडसे (वय ३०) या महिलेने आरोपीच्या त्रासाला कंटाळून घरातील लोखंडी आड्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. २९ जून रोजी ही घटना घडली. हदगाव पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. फौजदार फोलाने तपास करीत आहेत.
तरुणाची आत्महत्या
मुदखेड : नागेली ता.मुदखेड येथील सदानंद भारत गव्हाणे (वय ३१) या तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळाले नाही. अर्धापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
गळफास लावून आत्महत्या
हिमायतनगर : तालुक्यातील खडकी येथील देवराव किशनराव बराडे यांनी शनिवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळाले नाही. हिमायतनगर पोलिसात पांडुरंग वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
जि.प.शाळेत वृक्षाराेपण
हदगाव : तालुक्यातील खरटवाडी येथे जि.प. शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच रुक्मीणबाई पुंजरवाड, गटशिक्षणाधिकारी के.व्ही. फोले, मधुकर सरोदे, पं.स. सदस्य संदीप राठोड, शा.व्य.स.चे अध्यक्ष दत्ता बास्टेवाड, केंद्रप्रमुख गोदाजी लकडे, तंटामुक्त अध्यक्ष प्रेमला जिंकलवाड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक चंद्रकांत भांडवले यांनी तर मुख्याध्यापक चंद्रकांत कुणके यांनी आभार मानले.
शहराध्यक्षपदी डॉ.शेख
नायगाव : काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या नायगाव तालुका शहराध्यक्षपदी डॉ.इब्राहीम शेख यांची नियुक्ती झाली. माजी आ.वसंत चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल शेख यांचे अनेकांनी स्वागत केले.
जिल्हाध्यक्षपदी पाटील
माहूर : पोलीस पाटील संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी माहूर तालुका गाव कामगार संघटनेचे हेमंत पाटील गावंडे यांची नियुक्ती झाली. राज्याध्यक्ष पंढरीनाथ पाटील यांनी ही नियुक्ती केली. त्यांना नियुक्तीची सनद देण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष खंडेराव पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष मारोतराव कदम, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष दिगंबर कदम, व्यंकट सुवर्णकार, रामदास चव्हाण, कानोजी मोळके, माधवराव टाकळे, संजय होनराव आदी उपस्थित होते.
दिगंबर वाघ यांचा सत्कार
नांदेड : नाळेश्वर ता.नांदेड येथील दिगंबर वाघ हे नांदेड येथील रामगोपाल गुप्ता को.ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल लि. येथून सेवानिवृत्त झाले. त्यांना नाळेश्वर ग्रामस्थांच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी रोहिदास वानखेडे, उपसरपंच बाबुराव वाघ, रंगनाथराव वाघ, शंकर वाघ, दत्ता बोकारे, दत्ता इंगोले, प्रभाकर धवल, हरी धोतरे, गंगाधर वाघ, मधुकर वाघ, देवीदास वाघ, गोविंदराव वाघ, अण्णाराव वाघ, बालाजी वाघ उपस्थित होते.
संभाजी बनसोडे सेवानिवृत्त
हिमायतनगर : सरसम बु. येथील कै.श्रीधरराव देशमुख विद्यालयातील सेवक संभाजी बनसोडे सेवानिवृत्त झाल्याने, त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्याम देशमुख सरसमकर यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक पी.व्ही. कळसे यांनी तर आभार प्रदर्शन बाबुराव सुरमवाड यांनी केले.
सूर्यतळ यांचा सत्कार
देगलूर : मरखेल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एन.सी. सूर्यतळ सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, पोलीस उपनिरीक्षक अजीत बिरादार, जमादार मोहनराव कनकवळे, सरपंच मच्छींद्र गवाले, पोलीस नाईक शेख, वाघमारे, पठाण, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू चामलवाड आदी उपस्थित होते.
वाढीव दराने विक्री
किनवट : किनवट तालुक्यातील काही दुकानदार भावफलक न लावताच, वाढीव दराने किराणा वस्तूंची विक्री करीत आहेत. खाद्यतेलाचे पाकीट १ किलो असल्याचे दर्शवून १५० ते १६० रुपयांना विक्री केली जाते. प्रत्यक्षात त्यात ९०० मिलीग्रॅम खाद्यतेल असते, असा अनुभव ग्राहक घेत आहेत.
शहराध्यक्षपदी इरफान बेग
नायगाव : ऑल इंडिया तंजीम ए इन्साफ नरसी ता.नायगावची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहराध्यक्षपदी इरफान बेग यांची निवड झाली. संघटक म्हणून शेख शमशोद्दीन, सचिव इम्रान आळंदीकर, उपाध्यक्ष शेख शाहेद, कोषाध्यक्ष शेख एजाज, कार्याध्यक्ष सय्यद चांदपाशा यांची निवड झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष अब्दुल माजीद उपस्थित होते.
कुंडलवाडीत वीजबिलांची वसुली
कुंडलवाडी : थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी सकाळपासूनच ग्राहकांच्या दारात उभे राहून वसुली करत आहेत. बिल न भरल्यास ग्राहकांचा वीजपुरवठा जागेवरच खंडित केला जात आहे, अशी माहिती कनिष्ठ अभियंता सुजय निकम यांनी दिली. या मोहिमेत विठ्ठल गुडले, अनिल उपशलवार, बालाजी तळणे, लक्ष्मण श्रीरामे, शंकर संगेवार आदी सहभागी आहेत.