बनावट कॉल सेंटर प्रकरणात डोंबिवलीतून पकडलेल्या दोघांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:47 PM2021-06-12T16:47:03+5:302021-06-12T16:50:03+5:30
crime in Nanded नांदेड शहरातील फळ विक्रेते अब्दुल मोबीन अब्दुल माजीद बागवान यांना बजाज फायनान्सच्या नावाने फोनवरून संपर्क साधण्यात आला होता.
नांदेड : बजाज फायनान्सच्या नावाचा वापर करून बनावट कॉल सेंटरद्वारे अनेकांना गंडविणाऱ्या दोघांना डोंबिवलीत पकडण्यात आले हाेते. शुक्रवारी या दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी अशा प्रकारे किती जणांना गंडविले, याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
नांदेड शहरातील फळ विक्रेते अब्दुल मोबीन अब्दुल माजीद बागवान यांना बजाज फायनान्सच्या नावाने फोनवरून संपर्क साधण्यात आला होता. तुम्हाला २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले असून, त्याच्या विम्यासाठी सुरुवातीला ५० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. अब्दुल मोबीन यांनी संबंधित खात्यावर ५० हजार रुपये पाठविले. मात्र, त्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात येत होती. याबाबत अब्दुल मोबीन यांनी सुरुवातीला बजाज फायनान्सचे कार्यालय गाठले, परंतु बजाज फायनान्सने अशा प्रकारे कुणालाही फोन केला नसल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. नांदेड सायबर पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे शोध घेतला. या वेळी हे कॉल सेंटर कल्याण येथे असल्याचे समजले. इतवारा पोलिसांचे पथकही तेथे पोहोचले होते. या ठिकाणाहून दिनेश मनोहर चिंचकर आणि रोहित पांडुरंग शेरकर या दोघांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांना नांदेडात आणण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नांदेडात बजाज फायनान्सच्या नावाने या प्रकरणात ही पहिलीच तक्रार होती. या प्रकरणात पीएसआय अनिता चव्हाण यांनी तांत्रिक तपास केला.
एक कोटीची लॉटरी लागली
अन्य एका घटनेत नांदेड येथील सायबर सेलमध्ये शुक्रवारी एक तरुण आला व केबीसीची एक कोटीची लॉटरी लागली असून, संबंधित व्यक्ती कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी २५ हजार रुपये खात्यात टाकण्याची मागणी करीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक ए. टी. जाधव यांनी त्या तरुणाकडे आलेला संदेश आणि इतर बाबींची माहिती घेतली. हा फसवणुकीचा प्रकार असून, पैसे न पाठविण्याची सुचना त्या तरुणाला केली. त्यामुळे फसवणुकीचा हा प्रयत्न फसला.