भोकर (जि. नांदेड) : तालुक्यातील थेरबन येथील विवाहितेने प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग मनात धरून भावानेच दोघांचाही गळा कापून निर्घृण खून केल्याच्या प्रकरणाचा गुन्हा भोकर जिल्हा सत्र न्यायालयात सिद्ध झाला. गुरुवारी (दि. १८ ) सकाळी ११.३० वाजता याप्रकरणी न्या. एम. एस. शेख यांनी मुलीचा भाऊ दिगंबर दासरे यास फाशीची तर चुलतभाऊ मोहन दासरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
थेरबन येथील वेगवेगळ्या जातीतील पूजा दासरे-वर्षेवार (२२) व गोविंद कराळे (२५) यांचे प्रेम जुळल्यानंतर समाजात बदनामी होईल म्हणून घरच्यांनी पूजाचा विवाह भोकर येथील जेठीबा वर्षेवार यांच्यासोबत १० जून २०१७ रोजी केला होता. परंतु पूजाने सासर सोडून प्रियकराचे घर गाठले होते. याचा राग व अपमान सहन न झालेल्या पूजाचा भाऊ दिगंबर दासरे याने चुलतभाऊ मोहन दासरे यास सोबत घेऊन बहीण व तिचा प्रियकर यांचा तालुक्यातील दिवशी शिवारात २३ जुलै २०१७ रोजी विळ्याने गळा चिरुन निर्घृण खून करुन स्वत: दिगंबर दासरे भोकर पोलिसांत येऊन हजर झाला होता.
याबाबत भोकर पोलिसांत आरोपी दिगंबर व मोहन विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद होता. तत्कालीन पो.उपनि. सुशील चव्हाण यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात ८ साक्षीदार तपासण्यात येऊन प्रत्यक्ष साक्षीदार नसलातरी सबळ परिस्थितीजन्य पुराव्यावरून गुन्हा सिद्ध झाल्याचे न्या. ए.एस. शेख यांनी बुधवारी झालेल्या अंतिम तपासणीत सुनावले होते. आज सकाळी न्यायमूर्तीनी यावर शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. रमेश राजूरकर यांनी आॅनर किलिंग असल्याने मृत्यूदंडाची विनंती केली होती. तर आरोपीचे वकील मोहन जाधव यांनी आरोपींचे वय, वृद्ध माता- पिता असल्याने कमीत-कमी शिक्षेची विनंती केली.