नांदेड : शहरातील विविध भागांतून चोरीस गेलेल्या बारा दुचाकी वजिराबाद पोलिसांनी जप्त केल्या असून, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात अटक केलेल्या चोरट्यांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी पोलिसांना आदेश दिले होते. तपासादरम्यान नांदेड तालुक्यातील सुगाव येथील एक अल्पवयीन बालक मास्टर चावीद्वारे दुचाकी लंपास करीत असल्याची माहिती मिळाली. सदर बालकास मुदखेड तालुक्यातील जवळाबाजार येथील प्रफुल्ल भिसे आणि दिनेश सिद्धार्थ भिसे हे दोघे जण दुचाकींची चोरी करायला लावत असत. त्यांच्या मदतीने दुचाकीचे कुलूप तोडले जात होते. अल्पवयीन मुलास वजिराबाद पोलिसांनी सुगाव येथून ताब्यात घेतले.
प्रफुल्ल भिसे व दिनेश भिसेचा शोध घेतला असता ते दोघे जण मुंबई येथे मेट्रो रेल्वेचे काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांना तेथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी नांदेड शहरातून वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर ठाण्यांतर्गत बारा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. त्यांनी चोरलेल्या इतर सात दुचाकींची माहिती घेतली जात आहे. त्या दुचाकीही जप्त करण्यात येतील, असे जाधव म्हणाले. वजिराबाद पोलिसांनी प्रफुल्ल भिसे आणि दिनेश भिसे या दुचाकी चोरट्यांना मंगळवारी न्यायालयापुढे उभे केले असता २० जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.