Valentine Day : प्रेमांकुराला समाजसेवेचे खतपाणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:06 PM2019-02-14T12:06:30+5:302019-02-14T12:06:37+5:30
मिर्झा फय्याज बेग आणि विजयश्री बेग या जोडप्याने सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रमांत हिरीरीने सहभाग घेतला़
- शिवराज बिचेवार
नांदेड : महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम याबरोबरच सेवा योजनांच्या शिबिराच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले़ प्रेमाच्या आणाभाकासह समाजसेवेचा वसा घेत सहा वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या मिर्झा फय्याज बेग आणि विजयश्री बेग या जोडप्याने सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रमांत हिरीरीने सहभाग घेतला़ प्रेमांकुराला समाजसेवेचे खतपाणी मिळाल्यामुळेच आयुष्यभर त्यांनी वंचितांसाठी काम करण्याचा निश्चय केला आहे़
प्रेम हे धर्म-जात पाहून होत नसते़ एकमेकांची मन आणि भावना जुळल्या की प्रेमांकुर फुलू लागतात़ मिर्झा फय्याज बेग आणि विजयश्री बेग यांच्या बाबतीतही तसेच काहीसे घडले़ दोन भिन्न समाजांतील या प्रेमाला त्यावेळी मोठा विरोध झाला होता़ परंतु एकमेकांच्या साथीने त्यावर मात करीत आज २० वर्षे हे जोडपे सुख-समाधानाने राहते़ मनात रुजविलेली समाजसेवेची संकल्पना २००५ मध्ये तिरंगा परिवाराच्या माध्यमातून पुढे आली़ कुणी सोबत असो अथवा नसो, एकमेकांची साथ मात्र कायम; असा दृढ निश्चय करीत त्यांनी तिरंगा रॅली, एकता के स्वर, एक शाम आजादी के नाम यासारखे देशभक्तीपर उपक्रम सुरु केले.
त्या माध्यमातून सर्व जाती-धर्मातील तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा उद्देश होता़ त्याचबरोबर गरिबांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला़ या उपक्रमाला नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला़ त्यामुळे गरीब कुटुंबांची दिवाळी गोड झाली़ दोन वर्षापूर्वी सुरु केलेल्या तिरंगा वस्त्र बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख जणांना कपडे वाटप करण्यात आले आहेत़ बेग दाम्पत्याने सुरु केलेला तिरंगा परिवार आज लाखो गरिबांसाठी मोठा आधार ठरत आहे़
प्रेम त्यागावर करावं...
महाविद्यालयीन जीवनात घेतलेला समाजसेवेचा वसा हे दाम्पत्य आजही तेवढ्याच उत्साहाने चालवित आहे़ कुटुंबांची जबाबदारी सांभाळत तिरंगा वस्त्र बँकेचा कारभारही विजयश्री पाहतात़ आज जाती-जातीत किरकोळ कारणावरुन तेढ निर्माण होत असताना बेग कुटुंबियांनी मात्र आपल्या कार्यातून प्रेम कुणावर कराव़ं....क़ुणावरही कराव...योगावर करावं...भोगावर करावं... आणि त्याहूनही अधिक त्यागावर कराव़ं...असा संदेश दिला आहे़