नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा; आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला
By शिवराज बिचेवार | Published: June 7, 2023 06:35 PM2023-06-07T18:35:36+5:302023-06-07T18:35:53+5:30
सध्या देशात आणि राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना बोलण्यासाठी काही विषय नाहीत.
नांदेड- राज्यात गेल्या काही महिन्यात दंगली घडत आहेत. या दंगलीत आग ओतण्याचे काम विराेधकांकडून होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गृहमंत्री फडणवीसांबद्दल केलेले वक्तव्य कुणीही फारसे गांभीर्याने घेत नाही. नाना पटोलेंच्या नाना तऱ्हा आहेत अशा शब्दात भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका केली.
भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडात सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दरेकर हे बुधवारी नांदेडात आले होते. ते म्हणाले, दंगली कुणीही भडकविण्याचा प्रयत्न करू नये. सध्या देशात आणि राज्यात चांगले काम सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना बोलण्यासाठी काही विषय नाहीत. त्यामुळे आगीत तेल ओतण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांचा राजीनामा मागितला. पटोले हे प्रदेशाध्यक्ष असून ते आजपर्यंत कधी विकासावर बोलले का? नेहमी वादग्रस्त बोलायचे हे त्यांचे ठरलेलं आहे. असेही दरेकर म्हणाले.
अमित शाहांचे नांदेडवर विशेष प्रेम
महाजनसंपर्क अभियानाची महाराष्ट्रात नांदेडला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभा घेणार आहेत. हे नांदेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे नांदेडच्या विकासाला चालना मिळेल. अमित शाहांचे नांदेडवर विशेष प्रेम असल्याचेही दरेकर म्हणाले.