नांदेड : पावसाचे आगमन लांबल्याने चिंताग्रस्त झालेल्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नांदेडकरांना दिलासा देणारी बाब घडली असून विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २.१० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यातून १५ जुलैपर्यंत नांदेडकरांची तहान भागणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून झालेल्या अवैध पाणी उपशामुळे नांदेडकरांना मे महिन्याच्या मध्यापासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाचे कागदावरील नियोजन जूनच्या पहिल्या आठवड्यातच उघडे पडले. जूनच्या पहिल्या आठवड्यात विष्णूपुरी प्रकल्प कोरडाठाक झाला. तेथून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. मुंबईत पालकमंत्री रामदास कदम यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पाण्याचे वास्तव महापालिकेने सांगितले. त्यावेळी सिद्धेश्वर धरणातून पाणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणीही झाली. सिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरीपर्यंत पाणी आणताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. अखेर ही कसरत यशस्वीच झाली आहे. विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २.१० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे.आजही विष्णूपुरी प्रकल्प मृत जलसाठ्यातच आहे. प्रकल्पात जिवंत जलसाठा उपलब्ध होण्यासाठी आणखी ०.६६ दलघमी पाणी आवश्यक आहे. सिद्धेश्वर धरणातून आणखी दहा दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. यातून प्रकल्पाचा साठा जिवंत साठ्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले असले तरीही प्रत्यक्षात आठ ते दहा दिवसानंतर पाणी उपलब्ध होत आहे. प्रकल्पातच पाणी नाही असे सांगितले जात आहे. त्यातच महावितरणच्या खंडित होणाºया विद्युत पुरवठ्याचाही मोठा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.एकूणच सिद्धेश्वर धरणातील मृत जलसाठ्यातून नांदेडकरांची तहान कशी-बशी भागली आहे. उपलब्ध झालेले पाणी नियोजनपूर्वक पुरवठा करण्याची गरज आहे.पाण्याच्या रक्षणासाठी पथके कार्यरतसिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरी प्रकल्पात १२० कि.मी. अंतर कापून पाणी येत आहे. हे पाणी रस्त्यात उपसले जावू नये यासाठी २१ पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकात महापालिका, पाटबंधारे विभाग आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. सिद्धेश्वर धरणापर्यंत ही पथके पाण्यावर गस्त घालत आहेत. पिण्यासाठी येत असलेले पाणी उपसा होऊ नये यावर नियंत्रण ठेवले जात आहे.
विष्णूपुरीत २ दलघमी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:51 AM