मृतांची आकडेवारी वाढण्याचे दुष्टचक्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 07:32 PM2020-10-07T19:32:51+5:302020-10-07T19:33:19+5:30
कोरोनाचे दुष्टचक्र कायम असून रूग्णसंख्या आटोक्यात आली तरी मृत्यूचे दिवसेंदिवस वाढत जणारे थैमान चिंताजनक ठरते आहे.
नांदेड : कोरोनाचे दुष्टचक्र कायम असून रूग्णसंख्या आटोक्यात आली तरी मृत्यूचे दिवसेंदिवस वाढत जणारे थैमान चिंताजनक ठरते आहे.
मंगळवारी जिल्ह्यात ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. बुधवारीही हे दुष्टचक्र कायम राहिले असून २४ तासांत आणखी सात जणांचा कोरोनाने बळी घेतल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची ४४६ झाली आहे. तसेच बुधवारी आणखी २०९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १६ हजार ८४१ एवढी झाली आहे.
मागील २४ तासात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील एकजण नांदेड शहरातील अशोकनगर येथील ८५ वर्षीय पुरुष आहे तर माहूर तालुक्यातील वाईबाजार येथील ६५ वर्षीय पुरुषाचाही उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला. देगलूर कोविड रुग्णालयात शारदानगर येथील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर शासकीय रुग्णालयात गजानन महाराज मंदिर परिसरातील ६२ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला. अर्धापूर येथील ७२ वर्षीय पुरुषावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होेते. त्यांचाही मृत्यू झाला तर हदगाव तालुक्यातील वडगाव येथील ७० वर्षीय इसमाचा हदगाव कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.