विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस सुरू आहे. विशेषत: परभणी जिल्ह्यात पाऊस होत आहे. पूर्णा नदीचे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढच होत आहे. विष्णुपुरी प्रकल्प सद्य:स्थितीत ८४ टक्के भरला आहे. प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने प्रकल्पाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येणार आहेत. प्रकल्पातील पाणी गोदावरीत सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाच्या खालील बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांनी आपल्या मालमत्तेची, पशुधनाची हानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचवेळी नदीपात्र परिसरात असलेल्या वीटभट्टी साहित्य व इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी नांदेड, मुदखेड, उमरी, नायगाव, लोहा तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असून, खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.
चौकट - गतवर्षी १० जुलै रोजी उघडले होते दरवाजे
विष्णुपुरी प्रकल्पाद्वारे नांदेड शहराची तहान भागवली जाते. हा प्रकल्प कधी भरणार याकडे नांदेडकरांचे लक्ष असते. हा प्रकल्प पहिल्यांदाच जूनमध्ये भरत आहे. गतवर्षीही चांगला पाऊस झाल्याने जुलै महिन्यात प्रकल्प भरला होता. १० जुलै रोजी प्रकल्पाचे दरवाजे उघडून गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले होते. १ जून रोजी प्रकल्पात ४२ दलघमी पाणीसाठा होता तो १० जून रोजी ८४ टक्क्यांवर पोहोचला आहे.