नांदेड : महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरु केली आहे़ याबाबतचे आदेश फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यातच येवून धडकले होते़ लाचलुचपतच्या पोलीस महासंचालकांनी वाघमारेंच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत़ या चौकशीत आता नेमके काय निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या कुक्कडगावकर या आडनावावरुनही यापूर्वी बरेच वादंग निर्माण झाले होते़ त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी अपंग प्रमाणपत्र बनावट वापरल्याचाही त्यांच्यावर आरोप होता़ हा वाद न्यायालयातही गेला होता़ त्यामध्ये त्यांना दिलासा मिळाला होता़ त्यात मागील वर्षीच वाघमारे यांनी महापालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती़ त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या़दरम्यान, त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी कायदेशीर उत्पन्नापेक्षा अधिकचे उत्पन्न जमा केल्याच्या तक्रारी लाचलुचपतचे महासंचालक यांच्याकडे करण्यात आल्या होत्या़ त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगररचना विकास विभागाची परवानगी घेवून वाघमारे यांच्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश दिले़ सुरुवातीला ही चौकशी अन्य एका अधिकाऱ्याकडे होती़ त्यांच्याकडून ती काढून पोनि़ काकडे यांच्याकडे देण्यात आली़
- आतापर्यंत त्यांच्या काही मालमत्तांची चौकशी झाली आहे़ त्याचबरोबर त्यांच्या इतर व्यवसायातील भागीदारांचीही चौकशी होणार का? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे़ वाघमारे यांचे मित्र, नातेवाईक व भागीदार यांच्या नावाने त्यांच्या काही मालमत्ता आहेत काय? बाहेरदेशातील दौरे याचीही तपासणी करण्यात येत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सूत्रांनी सांगितले़
- रत्नाकर वाघमारे यांच्या संपत्तीची उघड चौकशी करण्याचे आदेश मला मिळाले आहेत़ मंगळवारीच हे आदेश माझ्याकडे आले आहेत़ नियमानुसार त्यांच्या संपत्तीबाबत विभागाकडून चौकशी सुरु असल्याची माहिती पोनि़बाबासाहेब काकडे यांनी दिली़