बारूळ : मानार प्रकल्प परिसरातील पाच किमी अंतरावरील राहटी, वरवंट या गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी पूर्णत: आटल्या असून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन हिवाळ्यातच पाणीटंचाई सुरु झाल्याने राहटी व वरवंट येथील ग्रामपंचायतच्या वतीने उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.बारुळ मानार प्रकल्पात १४६ दलघमी जलसाठ्याची क्षमता असून या प्रकल्पावर २४ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. तसेच कंधार, नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यांतील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. आजघडीला या प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठा असून हे पाणी पिण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, जिल्हाधिकारी यांनी आरक्षित केले आहे.बारुळ, वरवंट, राहटी येथील ग्रामस्थांनी मानार प्रकल्प पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाºयांना या प्रकल्पासाठी आमची घरे, जमिनी गेल्या असून त्यामुळे प्रकल्पातील पाणी आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला आरक्षित करुन द्यावे, अशी मागणी वारंवार केली; पण त्यावर पुढे कोणतीही कारवाई झाली नाही.वरवंट, राहटी या गावांतील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या विहिरी पूर्णत: आटल्या आहेत. तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन मानार प्रकल्प उपविभागीय कार्यालय बारुळ, जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार यांना निवेदनाद्वारे केली. मात्र प्रशासनाने कालव्याद्वारे पाणी सोडल्याने ग्रामस्थ जाब विचारण्यासाठी प्रकल्प व पाटबंधारे विभागाकडे गेले असता अनुचित प्रकार घडू नये म्हणून उस्माननगर पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात केला होता. एकंदरीत या भागातील पाणीप्रश्न पेटल्याचे चित्र दिसून आले. उजव्या कालव्यात त्वरित पाणी न सोडल्यास ग्रामस्थांच्या वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.ग्रामस्थांचा गेट उचलण्याचा प्रयत्न, पोलीस बंदोबस्त मागविला
वरवंट,राहटी या गावांतील पाणीपुरवठा विहिरी आटल्या म्हणून नागरिकांनी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र प्रकल्पातील संपूर्ण पाणी आरक्षित आहे. पाणी सोडण्यासाठी जि. प. विभागाची परवानगी घेऊन सोडण्यात येईल. या दोन्ही गावांतील काही नागरिक गेट उचलण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आल्यामुळे पोलीस बंदोबस्त मागविला होता. -आर. जी. कु-हेकर, उपविभागीय अधिकारी, बारुळ ,मानार प्रकल्प़या प्रकल्पासाठी आमच्या जमिनी, घरे गेली. त्याच प्रकल्पातून पाणी मिळण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. नागरिक पाण्यासाठी भटकंती करत आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. येत्या चार दिवसांत उजव्या कालव्यात पाणी न सोडल्यास अख्खे गाव उपोषणास बसणार आहे.- शिवराज बारसे, सरपंच राहटी