अनुराग पोवळे।नांदेड : जिल्ह्यात आजघडीला लोहा नगरपालिका क्षेत्रात सुनेगाव तलाव कोरडा पडल्याने आठ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. लोह्यासह आता हदगाव, हिमायतनगर, अर्धापूर, मुखेड, नायगाव, मुदखेड या सात नगरपालिकांना आता टँकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती उद्भवली आहे.लोहा न. प. क्षेत्रात सुनेगाव तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. लोह्याला प्रतिदिन १.५ दशलक्ष लिटर पाणी लागत होते. हा तलाव एप्रिलअखेरीस कोरडा पडल्याने लोहा शहराला आठ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.हदगाव नगरपालिका क्षेत्रात पैनगंगा नदीवरुन कोथळा येथून पाणीपुरवठा केला जातो. हदगाव शहरासाठी प्रतिदिन १.२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा आवश्यक आहे. कोथळा येथील पाणी आता तळाला गेले असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. पर्यायी पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून घेतले जावू शकते. हिमायतनगर नगरपालिका हद्दीत मंगरुळ बंधाऱ्यातून पाणी घेतले जाते. मंगरुळ बंधारा आता कोरडा पडला असून शहराची तहान टँकरद्वारेच भागवावी लागणार आहे. खाजगी विंधन विहिरी अधिग्रहीत करुन हिमायतनगर शहराचा पाणीप्रश्न सुटू शकतो. शहराला प्रतिदिन १.५ दशलक्ष लिटर पाणी आवश्यक आहे. अर्धापूर शहरालाही प्रतिदिन १.३५ दशलक्ष लिटर पाणी आवश्यक आहे. अर्धापूर शहरासाठी न.प.ने १ दलघमी पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात आरक्षित केले आहे. टंचाई कालावधीत विंधन विहिरी अधिग्रहीत करुन टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी न.प.कडून सुरू आहे.मुखेड तालुक्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती आजघडीला आहे. मुखेड न. प. लाही कुंद्राळा तलाव कोरडा पडल्याने आता टँकरचा पर्याय शोधावा लागणार आहे. मुखेडसाठी प्रतिदिन १.३८ दशलक्ष लिटर पाणी आवश्यक आहे. टंचाई काळात सोनपेठवाडी तलावाच्या पाळूच्या बाजूस चार विंधन विहिरी करणे, जुनागाव विहीर व मोहनावती विहिरीतील गाळ काढणे व तेथे पंप बसवून जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा करता येवू शकतो. त्याचवेळी टँकरचा शेवटचा पर्यायही उपलब्ध आहे. नायगाव नगरपालिका क्षेत्रात धानोरा साठवण तलावातून पाणीपुरवठा केला जातो. हा साठवण तलावही आता कोरडा पडला असून खाजगी विंधन विहिरीचे अधिग्रहण करुन टँकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुदखेड शहराला प्रतिदिन ४ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. हा पाणीपुरवठा पिंपळकौठा येथील पाझरतलाव आणि सीता नदीवरील उद्भव विहिरीतून केला जातो. हे जलस्त्रोतही आता कोरडे झाले असून टँकरचा पर्याय उपलब्ध आहे. खाजगी विंधन विहिरीचे अधिग्रहण करुन शहराला पाणीपुरवठा केला जावू शकतो. जिल्ह्यात न.प. क्षेत्रात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. गतवर्षी अर्धापूर न.प. क्षेत्रात १७ टँकरने पाणीपुरवठा केला होता. यावर्षी लोहा शहराला आठ टँकरने पाणी दिले जात आहे. मुखेड तालुक्यातील परिस्थिती पाहता मुखेड न.प. क्षेत्रालाही लवकरच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येवू शकते. एकूणच शहरी क्षेत्रात पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.सहा न.प. क्षेत्रात पाणीटंचाई नाहीजिल्ह्यातील किनवट, भोकर, कुंडलवाडी, उमरी, बिलोली, कंधार या नगरपालिका क्षेत्रात सद्य:स्थितीत पाणीटंचाई नसल्याचे स्पष्ट झाले आहे. किनवट तालुक्याला नागझरी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पात जुलै २०१९ पर्यंतचा जलसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ भोकर नगरपालिका क्षेत्रात सुधा प्रकल्पातून पाणी घेतले जाते. या प्रकल्पातही मे अखेरपर्यंतचे पाणी शिल्लक आहे. भोकरसाठी प्रतिदिन ३.५ दशलक्ष लिटर पाणी लागते. कुंडलवाडी न.प.ला बाभळी बंधाºयातून प्रतिदिन १.५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. बाभळीतील पाणी मे अखेरपर्यंत उपलब्ध आहे. उमरी शहराला कुदळा मध्यम प्रकल्पातील पाणी दिले जाते. याचवेळी कंधार शहराला लिंबोटी आणि बिलोली शहराला मांजरा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही शहराला सद्य:स्थितीत पाणी उपलब्ध आहे.
सहा न.प.क्षेत्रात टँकरने पाणीपुरवठा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:53 PM
अनुराग पोवळे। नांदेड : जिल्ह्यात आजघडीला लोहा नगरपालिका क्षेत्रात सुनेगाव तलाव कोरडा पडल्याने आठ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
ठळक मुद्देपाणीबाणी : नांदेड शहरासह जिल्ह्यातील सहा न.प.क्षेत्रातही पाणीटंचाई