पाण्यासाठी दाहीदिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:18 AM2019-02-23T00:18:51+5:302019-02-23T00:19:44+5:30
सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाल्याने येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा प्रश्न दाहक होणार आहे़ या पार्श्वभूमीवर गावागावांतून टँकरसह अधिग्रहणाची मागणी वाढत आहे़
नांदेड : सरासरीच्या अत्यल्प पाऊस झाल्याने येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा प्रश्न दाहक होणार आहे़ या पार्श्वभूमीवर गावागावांतून टँकरसह अधिग्रहणाची मागणी वाढत आहे़ जिल्हा परिषद प्रशासनानेही पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना हाती घेतल्या असून जिल्ह्यातील १६ तालुक्यांत २ हजार ८२७ उपाययोजनांची कामे करण्यात येणार आहेत़
जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ९५५ मि़मी़ इतके आहे़ मात्र पावसाने मागील वर्षी सरासरीही गाठली नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील देगलूर, उमरी, मुखेडसह अन्य तालुक्यांना येणाºया काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे़ नांदेड शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया विष्णूपुरी प्रकल्पातही केवळ दोन महिने पुरेल एवढे पाणी आहे़ त्यात वरच्या भागातून नांदेडसाठी पाणी येण्याची आशाही मावळली आहे़ दिग्रस बंधाºयात राखीव ठेवण्यात आलेले पाणी उचलण्यात आले असून आगामी काळात शहरावरही भीषण टंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे़ या पार्श्वभूमीवर नांदेड महानगरपालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत़
तसेच ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेनेही ६८ कोटी २२ लाख रुपयांचा कृती आराखडा मंजूर केला आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर २०१७ ते जून २०१८ या कालावधीत २७ कोटी १४ लाख ६१ हजार रुपयांचा निधी तीन टप्प्यात जिल्हा परिषदेला मिळाला होता़
यामधून जिल्ह्यातील १६ तालुक्यात २ हजार ८२७ उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत़ यात नळयोजनेची दुरुस्ती, इंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिर घेणे, तात्पुरती पूरक नळ योजना, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीर अधिग्रहण व विहिरींचे खोलीकरण यासह गाळ काढणे या उपाययोजना करण्यात आल्या आहेत़
या उपाययोजनावर झालेल्या खर्चाचा निधी संबंधित पंचायत समित्यांना यापूर्वीच पाठविण्यात आला आहे़ दरम्यान, शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीगळतीही मोठ्या प्रमाणात होत आहे़ आगामी काळात बाष्पीभवनाचा मुद्दाही मोठा आहे़ त्यात आतापासूनच शहरालगत असलेल्या वाढीव परिसराला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत़ वाडी, पावडेवाडी, काबरानगर, विशालनगर, यशनगरी यासह इतर भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ या परिसरातील बोअरही आटले असून नळयोजनेद्वारे मिळणारे पाणी अपुरे पडत आहे़ त्यामुळे नागरिकांना पैसे खर्च करुन पाणी विकत घ्यावे लागत आहे़ यामध्ये टँकरमाफियांची मात्र दिवाळी होत आहे़
अनेक तालुक्यांनी गाठली नव्हती पावसाची सरासरी
जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९५५़५४ एवढी आहे़ मागील पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीच्या ८०़९५ टक्के इतका पाऊस झाला आहे़ यात मुखेड तालुक्यात ५८़६९, नायगाव-६६़९७, धर्माबाद-७३़८३, बिलोली-५८़३०, देगलूर-३९़८० तर किनवट तालुक्यात ६६़२७ मि़मी़इतका पाऊस झालेला असल्याने या सर्व तालुक्यांना येणा-या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो़ भोकर आणि मुदखेड या दोन तालुक्यातच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता़
शहराची तहान भागविण्या-या विष्णूपुरी प्रकल्पात सध्या मोजकाच जलसाठा उपलब्ध आहे़ यापूर्वी विष्णूपुरीतून शेतक-यांसाठी एक पाणीपाळी देण्यात आली होती़ त्यात शेतक-यांनी विष्णूपुरीतून शेतीसाठी आणखी पाणी पाळ्या सोडण्याची मागणी केली आहे़ त्यामुळे हा विषय आता गंभीर झाला आहे़ या पाणीप्रश्नावर आता राजकारण केले जात आहे़