जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. रुग्ण आढळणे आणि मृत्यूची आकडेवारी अस्वस्थ करून सोडत आहे. त्यात खाटा, ऑक्सिजन आणि इंजेक्शन मिळत नसल्याने नागरिक आणि यंत्रणा दोघेही मेटाकुटीला आले आहेत. थोडीही शंका आल्यास नागरिक तपासणी करून घेत आहेत. परंतु तपासण्या वेगाने करण्यासाठी यंत्रणा कमी पडत आहे. शुक्रवारी तर किट संपल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना परत जावे लागले. त्यातच आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर अहवाल येण्यासाठी दोन ते तीन दिवस वाट पहावी लागत आहे. त्यामुळे रुग्ण अहवालाची वाट न पाहताच रुग्णालयात जात आहेत. या ठिकाणी त्यांना थेट सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जात आहे. सिटी स्कॅन केंद्रात मोठी रांग लागत आहे. यामध्ये पॉझिटिव्ह कोण अन् निगेटिव्ह कोण हे कळायला मार्ग नाही. रुग्ण तपासणीनंतर मशीनचे निर्जंतुकिकरणही केले जात नाही. त्यामुळे बाधित नसलेल्या रुग्णांना या ठिकाणी लागण होण्याची दाट शक्यता आहे. तसेच कारण नसताना सिटी स्कॅन तपासणी करून रुग्णांची आर्थिक लूट करण्यात येतंय.
रुग्ण आला की पाठवला सिटी स्कॅनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:17 AM