वाडीचा रस्ता पावसाळ्यात होणार बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:12 AM2019-06-06T01:12:09+5:302019-06-06T01:13:12+5:30

फरांदेनगर ते वाडी बु़ या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून वाहने चालविणे त्रासदायक बनले आहे़ या मार्गावर दररोज दुचाकी वाहनांना अपघात होत असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे़

Will the Wadi road stop in the monsoon? | वाडीचा रस्ता पावसाळ्यात होणार बंद?

वाडीचा रस्ता पावसाळ्यात होणार बंद?

Next
ठळक मुद्देरस्त्याची दुरवस्था रस्त्याच्या कामाची टोलवाटोलवीखड्ड््यांमुळे होताहेत दररोज अपघात

नांदेड : फरांदेनगर ते वाडी बु़ या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून वाहने चालविणे त्रासदायक बनले आहे़ या मार्गावर दररोज दुचाकी वाहनांना अपघात होत असल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे़ हा रस्ता पावसाळ्यात बंद होणार असल्याने नागरिक चिंतेत आहेत़ रस्त्याची पावसाळापूर्वी दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे़
उत्तर नांदेड शहरातील फरांदेनगर ते वाडी बु़ हा मुख्य मार्ग खड्डेमय बनला आहे़ सध्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती जमा झाली आहे़ त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेवून वाहने चालवावी लागत आहे़ विशेष म्हणजे, या मार्गावर तीन शाळा असून शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांसाठी हा एकमेव रस्ता आहे़ सध्या या रस्त्याच्या एका बाजूने केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे़ खोदकामामुळे काळी माती रस्त्यावर पसरली आहे़ या मातीवरून अनेक वाहने घसरून पडत आहेत़ पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणे अवघड आहे़ त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे़ हा भाग ग्रामपंचायतीतंर्गत असल्याने संबंधितांनी या रस्त्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला आहे़ मात्र या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही़ त्यामुळे नागरिकांच्या संतप्त भावना आहेत़
दरम्यान, या रस्त्यावर सध्या केबल टाकण्याचे काम सुरू असून अगोदरच दुरवस्था झालेल्या या मार्गावर जेसीबीने खोदकाम केल्याने हा रस्ता नावालाच उरला आहे़ संबंधित कंत्राटदाराकडून खोदकाम केलेल्या ठिकाणी रस्ता पूर्ववत करण्याचा करार आहे़ मात्र कंत्राटदाराकडून या कराराचे पायमल्ली होत आहे़ फरांदेनगर ते वाडी हा रस्ता पूर्णत: वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने या भागातील शाळेतील कर्मचारी पावसाळ्यात काय होणार याची चर्चा करताना दिसत आहेत़
अनेकांना जडले पाठीचे, कमरेचे आजार
वाडी रस्त्याचे काम आचारसंहितेनंतर मुख्यमंत्री सडक योजनेतून होणार असल्याचे या भागातील लोकप्रतिनिधींनी घोषित केले होते़ मात्र आता आचारसंहिता संपली तरीही रस्त्याचे काम सुरू झालले नाही़ प्रारंभी या रस्त्याच्या कामाची निविदा निघाल्याचेही सांगण्यात आले होते़ मात्र जिल्हा परिषदेतून या रस्त्याची अशी कोणतीच निविदा निघाली नसल्याचे वाडी़ बु़ येथील राजकुमार पावडे यांना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले़ त्यामुळे या रस्त्याचे काम होणार की नाही, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे़
वाडी बु़ येथील १२ नागरिकांना या मार्गाने वाहने चालविल्यामुळे अनेक व्याधींना सामोरे जावे लागले आहे़ पाठीचा कणा, कमरेचे दुखणे या आजारासोबत दुचाकीला झालेल्या अपघातामुळे कोणाचे पायाचे हाड तर कोणाचे हात फॅक्चर झाले आहेत़ त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे़
वाडी परिसरातील शाळेतील शिक्षकांना हाच मार्ग ये- जा करण्यासाठी उपलब्ध आहे़ या रस्त्यावरील खड्ड््यांतून मार्ग काढून शाळेला जावे लागते़ वेळेवर पोहोचण्याच्या प्रयत्नात अनेकदा दुचाकीला अपघात होत आहेत़ या प्रश्नाकडे शाळेच्या प्रशासनाचेही दुर्लक्ष दिसून येत आहे़

Web Title: Will the Wadi road stop in the monsoon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.