बँक संचालक मंडळाच्या बैठकीत वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:20 AM2019-05-28T00:20:08+5:302019-05-28T00:21:29+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गटसचिवांच्या विषयावरुन वादळी चर्चा होण्याचा अंदाज येताच अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी बैठकीला दांडी मारत जि़ प़ त ठाण मांडले़ तर दुसरीकडे दहिफळे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा एकमताने मंजूर करण्यात आला़ दहिफळे यांनी घेतलेल्या जिल्हा देखरेख संघाच्या कर्मचाऱ्यांचे थकीत देणे चुकते करण्याच्या ठरावावर बैठकीत वादळी चर्चा झाली़
नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गटसचिवांच्या विषयावरुन वादळी चर्चा होण्याचा अंदाज येताच अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी बैठकीला दांडी मारत जि़ प़ त ठाण मांडले़ तर दुसरीकडे दहिफळे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा एकमताने मंजूर करण्यात आला़ दहिफळे यांनी घेतलेल्या जिल्हा देखरेख संघाच्या कर्मचाऱ्यांचे थकीत देणे चुकते करण्याच्या ठरावावर बैठकीत वादळी चर्चा झाली़
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बँकेचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी घेण्यात आली. या बैठकीला १३ संचालकांची उपस्थिती होती. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी दिलेल्या राजीनाम्यावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होवून एकमताने दहिफळे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला़ आजच्या बैठकीत एकूण ५६ विषयांवर चर्चा करुन एकमताने सर्व ठराव मंजूर करण्यात आले.
खरीप हंगामासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना ४० हजार व बहुभूधारक शेतकºयांना ७० हजार रुपये पीक कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला़ कै.श्यामराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमावर झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली. विषयपत्रिकेवरील ठरावावर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळच्या विषयात बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे यांच्या कार्यकाळात जिल्हा देखरेख संघाच्या कर्मचाºयांचे थकीत देणे देण्याचा ठराव मंजूर करुन ५ कोटी रुपयांची रक्कम देखरेख संघाच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती़ पाच महिन्यांपूर्वी ही रक्कम वर्ग करण्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा ठपका अध्यक्षावर ठेवण्यात आला़
जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या कार्यकाळात २०१२ मध्ये देखरेख संघाच्या कर्मचाºयांचे देणे जिल्हा बँकेने द्यावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे देणे शक्य नसल्याची भूमिका प्रशासकीय मंडळाने घेतली होती़ बँक प्रशासक मंडळाच्या या निर्णयाला देखरेख संघाने न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयासमोर बँकेची बाजू मांडताना देखरेख संघाच्या कर्मचाºयांचे देणे जिल्हा बँकेला बंधनकारक नसून हे कर्मचारी सेवा सहकारी सोसायटीचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे त्यांचे देणे देण्याचे दायित्व सोसायटीवर असल्यामुळे बँकेचा या कर्मचाºयांशी थेट संबंधच येत नसल्याची भूमिका मांडण्यात आली.
न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय राज्य शासनाच्या प्रधान सचिवांनी घेण्याचे आदेश दिले. प्रधान सचिवांनी जिल्हा उपनिबंधकांना आदेश देवून देखरेख संघाच्या कर्मचाºयांचे देणे देण्याची व्यवस्था सेवा सोसायटीच्या खात्यातून करण्याची सूचना दिली़ जिल्हा उपनिबंधकांनी सेवा सहकारी सोसायट्यांकडून ठराव घेवून ७ कोटी रुपयांची रक्कम सेवा सोसायटींची बँकेच्या खात्यात असल्यामुळे त्या रक्कमेतून हे देणे द्यावे, असा अहवाल जिल्हा उपनिबंधकांनी पाठविला होता.
जिल्हा उपनिबंधकांच्या या अहवालाची फेरतपासणी जिल्हा बँकेच्या प्रशासनाने केली़ त्यात सोसायट्यांची ७ कोटींऐवजी बँकेच्या खात्यात ५ कोटी रुपये असल्यामुळे ही रक्कम देखरेख संघाच्या खात्यात वर्ग करण्याचा ठराव गेल्या पाच महिन्यांपूर्वी घेण्यात आला. मंजूर झालेल्या ठरावानुसार देखरेख संघाकडे पैसे वर्ग करण्यात गौडबंगाल असल्याचा आरोप करण्यात आला़ त्यामुळे बैठकीत वादळी चर्चा झाली़
महिला संचालक बाहेर, पतीराज मात्र बैठकीत
जिल्हा बँकेत काँग्रेसच्या महिला संचालिका अन्नपूर्णाबाई देशमुख बळेगावकर या बैठक सुरु असताना अध्यक्षांच्या कॅबीनमध्ये बसून होत्या. बैठकीच्या कामकाजात मात्र त्यांचे पतीराज देगलूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर यांनी सहभाग घेतला़ राष्ट्रवादीच्या संचालिका गयाबाई चव्हाण यांनी काही वेळानंतर सभागृह सोडले़ राष्ट्रवादीच्या संचालिका जिजाबाई जगदंबे यांनी हजेरीपटावर स्वाक्षरी न करताच सभागृह सोडले. आजच्या बैठकीला नवनिर्वाचित खा़ प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ़ बापूसाहेब देशमुख गोरठेकर, प्रवीण पाटील चिखलीकर, गंगाधर राठोड, लक्ष्मण ठक्करवाड आदिंची अनुपस्थिती होती.