भाजपा पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे खोटे गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:17 AM2020-12-24T04:17:02+5:302020-12-24T04:17:02+5:30
बारड: मुदखेडातील भाजप पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे अशी मागणी भाजप शिष्टमंडळाकडून पोलीस अधीक्षकांना ...
बारड: मुदखेडातील भाजप पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे अशी मागणी भाजप शिष्टमंडळाकडून पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे.
शहरात पालिकेच्या वतीने विविध विकास कामे ओंकार कन्स्ट्रक्शनचे दादाराव ढगे यांच्याकडून होत असून निकृष्ट दर्जाची होत असलेल्या कामांची तक्रार भाजप पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे त्याचा राग मनात धरून पदाधिकाऱ्यांवर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची भेट घेऊन खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीचे लेखी निवेदन दिले आहे.
भाजप ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गोपनपल्ले व शहराध्यक्ष मुन्ना चांडक यांनी सदर काम हे निकृष्ट दर्जाचे तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याने सदर काम बंद करण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून दादाराव ढगे यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात खंडणीचा अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर काम निकृष्ट दर्जाचे व अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याची तक्रार केली होती. संबंधित गुत्तेदार यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पाच लाख रुपयाची खंडणी मागितली म्हणून खोटा गुन्हा दाखल केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी निवेदनावर भाजप जिल्हा मोर्चाचे अध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, महिला तालुकाध्यक्ष जयश्री देशमुख, माजी सभापती प्रल्हाद हटकर, तालुका सरचिटणीस अशोक पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष देवा पाटील धबडगे, उपाध्यक्ष गणेशराव येळमकर, बाजार समितीचे संचालक माधवराव पाटील गाढे, दिलीप देशमुख, भगवान नागेलीकर, गजानन कमळे, प्रकाश सूर्यवंशी, अमोल आडकिने, सुभाष येरपलवार, संतोष चिलवकर, माधवसिंग ठाकूर, गजानन लोमटे, सोनू चंद्रे, डिगांबर टिपरसे यांच्यासह गोविंद गोपनपले व शहराध्यक्ष मुन्ना चांडक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.