नंदुरबार जिल्ह्यातील १६ प्रकल्पांमध्ये ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:37 AM2019-02-28T11:37:25+5:302019-02-28T11:37:40+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील १६ लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट झाला असून आठ प्रकल्पांमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. दरम्यान, एकुण पाणी ...
नंदुरबार : जिल्ह्यातील १६ लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट झाला असून आठ प्रकल्पांमध्ये २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा आहे. दरम्यान, एकुण पाणी साठा केवळ ४० टक्के इतका आहे. येत्या महिनाभरात जिल्ह्यातील सर्वच लघु प्रकल्प कोरडे होण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीचा ६७ टक्के पाऊस झाला होता. झालेला पाऊस देखील अनियमित होता. त्यामुळे खरीपाचे नुकसान तर झाले. परंतु लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये देखील अपेक्षीत पाणीसाठा झाला नाही. जिल्ह्यात ३७ लघु व चार मध्यम प्रकल्प आणि दोन बॅरेजेस आहेत. त्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापर्यंत केवळ ६० टक्के पाणीसाठा झाला होता. एकही लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला नव्हता. केवळ रंगावली मध्यम प्रकल्प यंदा पुर्ण क्षमतेने भरला होता. आता सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला असून काही प्रकल्प कोरडे पडले आहेत.
१६ प्रकल्प कोरडे
जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार तालुक्यातील १६ प्रकल्प कोरडे झाले आहेत. या प्रकल्पांमध्ये ठणठणाट आहे. तर आठ प्रकल्पांमध्ये २५ टक्केच्या आत पाणीसाठा आहे. इतर प्रकल्पांमध्ये ४० ते ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मध्यम प्रकल्पांपैकी रंगावली मध्यम प्रकल्पात सरासरी ६० टक्के पाणीसाठा आहे. राणीपूर प्रकल्पात ५५ टक्के, दरा प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पांमधील खालावलेली पाणी पातळीमुळे अनेक प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी देखील यंदा अपेक्षीत आवर्तन सोडले गेले नसल्याचे चित्र आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांची रब्बी पिके वाया गेली तर काही भागात कमी उत्पादन मिळाले.
पाणी पातळी खालावली
जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमानामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू शकले नाही. शिवाय प्रकल्पांमध्येही अपेक्षीत पाणी साठा न झाल्याने भुगर्भातील पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. यंदा सरासरी एक ते दीड मिटरने पाणी पातळी खालावल्याचा अहवाल भुजल सर्व्हेक्षण विभागाने याआधीच दिला आहे. त्यामुळे पिकांना तर नाहीच आता पिण्यासाठी देखील पाणी नसल्याची स्थिती आहे.