कोठार : मागील दहा वर्षात जिल्ह्यातील 180 बालकांना एचआयव्ही, एड्सपासून वाचविण्यात जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाला यश आले आहे.एचआयव्ही एड्सग्रस्त गरोदर मातांकडून त्यांच्या होणा:या बाळाला एचआयव्ही, एड्सचे संक्रमण होण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणात असते. परंतु गरोदरपणात योग्य औषधोपचार मिळाला तर गरोदर मातांकडून एचआईव्ही, एड्सच्या संक्रमणपासून जन्माला येणा:या बालकांचा बचाव करता येतो. नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाला मागील दहा वर्षात जिल्ह्यातील 180 बालकांना एचआयव्ही, एड्सबाधित गरोदर मातांकडून होणारे एचआयव्हीचे संक्रमण रोखण्यात यश आले आहे. एचआयव्ही बाधित गरोदर मातेकडून होणा:या एड्स प्रतिबंध कार्यक्रमाअंतर्गत गरोदर मातांना तिस:या महिन्यापासून ए.आर.टी औषधोपचार सुरू करण्यात येतो. या मातांची प्रसूतीदेखील सरकारी दवाखान्यातच करण्यात येते. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या नवजात बालकाला ‘नेव्ही रॅपिन’ नावाचे औषध देण्यात येते. त्यानंतर त्या बालकांची सहा आठवडे, सहा महिने, बारा महिने, अठरा महिने अश्या टप्प्यात त्याची नियमित तपासणी करण्यात येते. अशा मातांना केवळ सहा महिने बाळाला अंगावरचे दूध पाजायचे असते. हा सर्व औषध उपचार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय इत्यादींमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येतो. आतापयर्ंत जिल्ह्यातील सुमारे 225 एचआयव्ही, एड्स बाधित गरोदर मातांना जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाच्या वतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत नंदूरबार जिल्हा रुग्णालयात जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग कार्यरत आहे. 2008 साली जिल्हा रुग्णालयात हा विभाग सुरू करण्यात आला. रुग्णांची एचआयव्ही, एड्सची तपासणी करणे, त्यांना मोफत औषधोपचारची सेवा पुरविणे व त्यांचे समुपदेशन करणे,जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधित रुग्णांची माहिती संकलित करणे व ती अद्ययावत ठेवणे, जिल्ह्यातील आरोग्य केंद्राना एचआयव्ही, एड्स तपासणी किट व औषधी उपलब्ध करून देणे, जिल्ह्यातील ‘दिशा’ केंद्राशी समन्वय ठेवून त्यांना वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करणे, एचआयव्ही आजाराच्या प्रतिबंधासाठी लोकांना माहिती देणे व जनजागृती करणे अश्या विविध स्वरूपाची कामे या विभागामार्फत केली जातात.
नंदुरबारातील 180 बालकांचा एचआयव्हीपासून बचाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:31 PM