शहादा व हिंगणीतील २२ जण क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:26 PM2020-06-30T12:26:44+5:302020-06-30T12:26:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/बामखेडा : शहरातील गणेशनगरमधील रुग्णवाहिका चालकाच्या संपर्कातील चौथ्या व्यक्तीचा कोरोना अहवालही पॉझिटीव्ह आल्याने वसाहतीत घबराट निर्माण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा/बामखेडा : शहरातील गणेशनगरमधील रुग्णवाहिका चालकाच्या संपर्कातील चौथ्या व्यक्तीचा कोरोना अहवालही पॉझिटीव्ह आल्याने वसाहतीत घबराट निर्माण झाली आहे. शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या चार तर ग्रामीण भागात तोरखेडानंतर हिंगणी गावातही ४९ वर्षीय पुरुष कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने तालुक्यात सहा रुग्ण झाले आहेत. रविवारी रात्री आलेल्या पॉझिटीव्ह अहवालातील व्यक्तीच्या संपर्कातील नऊ व हिंगणी येथील रुग्णाच्या संपर्कातील १३ जणांना शहादा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
दरम्यान, मामाचे मोहिदे येथील राज्य परिवहन महामंडळाचा बस चालकाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला शहरातील विलगीकरण कक्षात दाखल केले असून त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. हा चालक मुंबई येथून मामाचे मोहिदे येथे आला आहे.
हिंगणी येथे उपाययोजना
शहादा तालुक्यातील हिंगणी येथे परत एक ४९ वर्षीय रुग्ण आढळून आल्याने खबरदारी घेतली जात आहे. यापूर्वीच तोरखेडा येथे एक महिला रुग्ण आढळून आल्याने हिंगणी गाव बफर झोनमध्ये होते. हा रुग्ण पाच-सहा दिवसांपूर्वी झाडावरून पडला होता. त्यामुळे उपचारासाठी शिरपूर येथे खाजगी डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या हातात व पायात फ्रॅक्चर आढळून आल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथे खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आले. सोमवारी त्यांच्यावर तिथे शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्याअगोदर त्यांचे तेथे स्वब तपासणी घेतली असता रविवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे त्यांना धुळे येथील हिरे हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. पाच ते सहा दिवस गावातील त्यांचे मित्र व परिवार दवाखान्यात सतत त्यांच्यासोबत होते. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची भीती निर्माण झालेली आहे. कुटुंबातील नऊ व्यक्तींना व बाहेरील पाच व्यक्तींना असे एकूण १३ व्यक्तींना शहादा येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून १५ जणांना ग्रामपंचायत प्रशासनाने होम क्वारंटाईनही केले आहे. त्यामुळे हिंगणी ग्रामस्थांमध्ये काळजीचे सावट आहे. पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांनी हिंगणी गावाला भेट देऊन रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून गावात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गल्लीबोळात बॅरिकेट लावून संपूर्ण गाव बंद करण्यात आले आहे. हिंगणी ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून गावात घरोघरी जाऊन सरपंच, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय मोहने व आरोग्य कर्मचाºयांचे पथक गावात तैनात करण्यात आलेले आहे. तसेच गावात आरोग्य विभागातर्फे ग्रामस्थांची तपासणी सुरू आहे. या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, सरपंच सुनीलकुमार पाटील, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक हे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
शहादा शहरातील गणेशनगरमधील पॉझिटीव्ह रुग्णवाहिका चालक व त्याच्या नातेवाईकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा संपर्क असलोद, ता.शहादा येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत आल्याने गेल्या चार-पाच दिवसापासून बँक सील करण्यात आली आहे. तेथील दोन कर्मचाºयांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. २८ जून रोजी रात्री उशिरा मिळालेल्या पॉझिटीव्ह अहवालातील व्यक्तीची शहरात चहाची दुकान आहे. शिवाय तो जास्त व्यक्तींच्या संपर्कात आल्याचे समजते. त्यामुळे प्रशासनाला त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे कठीण जाणार आहे.