२८ हजार प्रवास परवाने मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:48 AM2020-07-07T11:48:41+5:302020-07-07T11:48:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे बाहेरगावी अडकून पडलेले तसेच कामानिमित्त जिल्ह्यातून परजिल्हा आणि राज्यात जाणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय प्रवास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे बाहेरगावी अडकून पडलेले तसेच कामानिमित्त जिल्ह्यातून परजिल्हा आणि राज्यात जाणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय प्रवास परवाने देत आहे़ यांतर्गत गेल्या १ महिन्यात जिल्ह्यातून २८ हजार जणांनी हे परवाने घेत प्रवास केला आहे़
गेल्या १५ दिवसात जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत उसळी आली आहे़ यातून पन्नासच्या आत असलेली रुग्ण संख्या ही १५ दिवसात १९० वर गेली आहे़ नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची अनेक कारणे असली तरी मूळ मार्ग हा प्रवास असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे़ तीन महिने लॉकडाऊन असल्याने घरात अडकून पडलेले अनेक जण विनादिक्कत शेजारील जिल्हे आणि राज्यातून प्रवास करून येत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढीस लागत आहे़ यात सिमावर्ती भागातील गावे आणि शहरे ही हॉटस्पॉट ठरत असल्याचे वेळावेळी स्पष्ट होत आहे़
जिल्ह्याच्या लगत असलेल्या मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील जिल्हे आणि तालुक्यांच्या ठिकाणीही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने उपाययोजनांना सध्यापेक्षा अधिक सजगतेने गती देण्याची गरज असल्याचे यातून समोर येत आहे़ गुजरात राज्यातील तापी, नर्मदा आणि डांग या तीन जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत़ जिल्ह्यातील नागरिकांचा सर्वाधिक व्यवहार असलेल्या सुरत या ठिकाणी सर्वाधिक पाच हजारपेक्षा अधिक केसेस आहेत़ नंदुरबार येथून सुरत येथे जाणारे आणि येणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने उपाययोजनांबाबत सतर्कता बाळगणे निकडीचे ठरत आहे़
जिल्हा प्रशासनाच्या वेबपोर्टलवर आॅनलाईन पासेसचे वितरण केले गेले आहे़ यांतर्गत आजअखेरीस एकूण ३९ हजार ९४९ जणांनी विविध प्रवासी कारणांसाठी अर्ज केले होते़ यातील २८ हजार ९५० जणांना जाण्या-येण्यास परवानगी देण्यात आली होती़ तर १० हजार ९४९ जणांच्या कारणांना नकार देत त्यांचे प्रस्ताव रद्द झाले आहेत़ मंजूरी देण्यात आलेल्या राज्यांतर्गत तसेच लगतच्या राज्यांमध्ये सूट या परवान्यातून मिळाल्याची माहिती आहे़ दर दिवशी किमान १ हजार जण प्रवासासाठी अर्ज करत आहेत़
सीमेच्या पलीकडील राज्यातील शहरांमधून कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी गव्हाळी ता़ अक्कलकुवा आणि नवापूर येथील राज्य सिमा तपासणी तर जिल्हांतर्गत सीमेवर रनाळे व ठाणेपाडा ता़ नंदुरबार सारंगखेडा व हिंगणी ता़ शहादा येथे चार चेकपोस्ट आहेत़ मध्यप्रदेश सिमेवर खेडदिगर येथेही चेकपोस्ट आहे़२३ मार्च रोजी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून या सर्व सात ठिकाणी
नंदुरबार जिल्ह्याला लागून मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याच्या सिमा आहेत़ गुजरात राज्यातील तापी, नर्मदा, डांग, छोटा उदेपूर हे चार जिल्हे शेजारी आहेत़ दुसरीकडे मध्यप्रदेशातील बडवानी, अलीराजपूर हे जिल्हे उत्तर पूर्व दिशेला आहेत़ या सर्व जिल्ह्यांसोबत जिल्ह्याच नियमित व्यवहार असलेल्या सुरत आणि भरुच या दोन जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे़
आजअखेरीस गुजरात राज्यातील सुरत येथे ५ हजार ९६८ रुग्ण आढळून आले आहेत़ यातील १८२ जणांचा मृत्यू झाला आहे़ तर ३ हजार ९२१ जण बरेही झाले आहेत़ भरुच येथे २९६ रुग्ण आढळले असून १० मृत्यू झाले आहेत़ छोटा उदेपूर ६१,नर्मदा जिल्ह्यात ९५, तापी २१ तर डांग जिल्ह्यात चौघांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती आहे़
मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यात आतापर्यंत १३० रुग्ण समोर आले असून चौघांचा मृत्यू झाला आहे़ प्रशासनाकडून परराज्यात ठोस कारणांसाठी जाणाऱ्यांना पासेस दिल्या जात आहेत़ यात वैद्यकीय कारणांसाठी गुजरात राज्यातील मोठ्या शहरांमध्ये जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ रेल्वे आणि बससेवा बंद असली तरी खाजगी वाहनांनी हा प्रवास सुरू आहे़
परराज्यासोबत लगतच्या धुळे जिल्ह्यात दर दिवशी कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंताही वाढत आहेत़