मनोज शेलार/नंदुरबार
नंदुरबार : रविवारी सकाळी आलेले वादळ आणि पावसामुळे जिल्हाभरात अनेक ठिकाणी नुकसान झाले. तळोदा तालुक्यात कारवर झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला तर अनेक ठिकाणी घराचे पत्रे उडाली, विजेचे खांब कोसळले. केळी पिकाचेही या वादळात मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली.
मेघ गर्जनेसह पाऊस झाला. ताशी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तळोदा-चिनोदा रस्त्यावर वडाचे जीर्ण झाड चालत्या कारवर कोसळल्याने चालक राजेंद्र रोहिदास मराठे (४८) रा.प्रतापपूर, ता.तळोदा यांचा जागीच मृत्यू झाला. नर्मदा काठावरील जीवन शाळेची पत्रे उडाली. शहादा, नवापूर, अक्कलकुवा तालुक्यात जवळपास ३० ते ४० घरांचे पत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकल्याने व तारा तुटल्याने निम्म्या जिल्ह्यातील वीज पुरवठा सायंकाळपर्यंत खंडित झाला होता. दरम्यान, या वादळामुळे शहादा तालुक्यात केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.