तळोदा : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त हाती घेतलेल्या रक्तदान शिबिराच्या मोहिमेत शनिवारी तळोदा येथे आयोजित केलेल्या शिबिरात ५६ जणांनी रक्तदान करून जिल्ह्यातून एक हजार रक्त बॅगांचा टप्पाही पार केला. त्यामुळे येथील सहयोग सोशल ग्रुपने केक कापून आनंदोत्सव साजरा केला होता.
ऐन कोरोना महामारीत शासनापुढे रक्ताचा साठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे ‘लोकमत परिवारा’ने रक्त संकलनासाठी रक्तदान अभियान राबविण्याचा निर्धार केला. या अभियानाची सुरुवात स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीपासून करण्यात आली आहे. हे शिबिर शुक्रवारी लोकमत व व्हीएसजीजीएम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या वाढदिवशी आदिवासी सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, डाॅ. महेंद्र चव्हाण, शाम राजपूत यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या वेळी ५६ दात्यांनी लोकमतच्या या महायज्ञात सहभागी होऊन रक्तदान केले. या वेळी डाॅ. वाणी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कोरोनाच्या अत्यंत बिकट परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत ‘लोकमत’ने हाती घेतलेला हा स्तुत्य उपक्रम खरोखर वाखाणण्याजोगा आहे. ‘लोकमत’च्या या चळवळीस निश्चितच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रा. दिनेश मराठे तर आभार वसंत मराठे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व नगरसेवक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ॲड. अल्पेश जैन, संतोष माळी, डाॅ. सुनील लोखंडे, डाॅ. मोरे, अमन जोहरी, दिग्विजय माळी, रमेश भाट, शाम सोनगडवाला, भारत गिरासे, नारायण जाधव, आंबालाल साठे, अविनाश माळी, डाॅ. बडगुजर, रवी चव्हाण, अमोल माळी, प्रवीण पाडवी, रजनीकांत बोरसे, आदर्श प्राथमिक विद्यामंदिर कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, होंडा शोरूमचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
डाॅ. संदीप यांना मिळाला एक हजारवा दात्याचा मान
‘लोकमत’ने गेल्या २ जुलैपासून जिल्ह्यात सुरू केलेल्या रक्तदान अभियानात तळोद्यात एक हजार बॅगांचा टप्पा पूर्ण केला आहे. येथील डॉ. संदीप जैन यांना एक हजारावा दात्याचा मान मिळाला आहे. त्यांनी यापूर्वीदेखील जवळपास २८ वेळा रक्तदान केले आहे. त्याचबरोबर डॉ. सुनील लोखंडे यांनीदेखील तब्बल ३४ वेळा रक्तदान केले आहे. अनेक वेळा त्यांनी आपत्कालीन परिस्थितीतील रुवग्णास रक्तदान केले आहे. आता ‘लोकमत’ने घेतलेल्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन रक्तदान केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
६५ वर्षीय वृद्धाने केले रक्तदान
लोकमतच्या या महायज्ञात शहरातील ६५ वर्षीय नागरिक परिमल चौकशी यांनीदेखील स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. त्यामुळे त्यांचा गौरव नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी लोकमतने हाती घेतलेल्या या महान कार्याचे कौतुक केले.