नंदुरबार : भरधाव कारने धडक दिल्याने तीन शेळ्या व एक गाय ठार झाली. या अपघातात १५ वर्षीय बालकालाही गंभीर इजा झाली. याबाबत शहादा पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, मंदाणा ते शहाणा रस्त्यावर कोळपांढरी शिवारात हा अपघात झाला. पोलिस सूत्रांनुसार, नीरज प्राणसिंग विश्वकर्मा (रा. विदीशा, मध्यप्रदेश) हे त्यांच्या कारने (क्रमांक एमपी ०९ सीटी ४७७४) जात होते. त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याने जाणाऱ्या गुरांच्या कळपात घुसली. त्यात तीन शेळ्या व एक गाय ठार झाली तर दिलवर सुदाम पावरा (१५ रा.कोळपांढरी, ता.शहादा) हा बालक जखमी झाला. एक शेळी व दोन वासरू देखील जखमी झाले.
याबाबत पोलिस कर्मचारी जितेंद्र ईशी यांनी फिर्याद दिल्याने नीरज प्राणसिंग विश्वकर्मा (३५, रा. विदीशा) यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार अशोक कोळी करत आहे.