कर्जबाजारीपणामुळे भालेर येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By मनोज शेलार | Published: April 1, 2023 07:39 PM2023-04-01T19:39:08+5:302023-04-01T19:39:27+5:30
बँकेचा कर्जाचा बोजा आणि अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे झालेले नुकसान यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने पिकांवर फवारणीचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना
नंदुरबार :
बँकेचा कर्जाचा बोजा आणि अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे झालेले नुकसान यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने पिकांवर फवारणीचे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना नगाव-भालेर, ता. नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय साहेबराव पाटील (५०) रा. भालेर, ता. नंदुरबार असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पाटील यांच्यावर बँकेचे दोन लाख ३० हजार रुपयांचे कर्ज होते. उसनवारीने ८० हजार रुपये घेऊन त्यांनी बँकेचे पीककर्ज भरले होते. परंतु उसनवारीचे पैसे आणि बँकेचे उर्वरित कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. त्यातच गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे हताश झालेल्या संजय पाटील यांनी कीटकनाशक प्राशन केले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत भाऊसाहेब संजय पाटील यांनी खबर दिल्याने नंदुरबार तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.