नंदुरबार - अक्कलकुवा ग्रामपंचायतीमधील गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन तीन प्रशासक, सरपंच व ग्रामकोष समितीचे सदस्य अशा ११ जणांना आरोपी करण्यात आले आहे. याबाबत गुरुवारी रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सूत्रांनुसार, अक्कलकुवा ग्रामपंचायतीत एप्रिल २०१६ ते मार्च २०१९ यादरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. त्याबाबत जिल्हा परिषदेने चौकशी केली असता १० लाख ८७ हजार ७७५ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार अक्कलकुवाचे गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी फिर्याद दिल्याने तत्कालीन प्रशासक तथा कृषी अधिकारी जगदीश सदाशिव बोराळे (वय ४०), विस्तार अधिकारी मनोज रामचंद्र देव (४२), विजयसिंग भोंगा जाधव (४७), तत्कालीन सरपंच उषाबाई प्रवीण बोरा (३५), ग्रामविकास अधिकारी आनंदा ओजना पाडवी (४७), ग्रामकोष समितीचे उमेश गंगाराम पाडवी (३८), राजेश्री इंद्रसिंग पाडवी (३७), सुपडीबाई बुधा पाडवी (५०), अमरसिंग हुपा वळवी (५२), लता प्रतापसिंग पाडवी (४८, सर्व रा. अक्कलकुवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत.