तळोदा तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:28+5:302021-07-19T04:20:28+5:30

तळोदा : तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असताना अक्षरशः कोरडेठाक आहेत. या सिंचन प्रकल्पांना जोरदार ...

All the five small scale irrigation projects in Taloda taluka are dry | तळोदा तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प कोरडेठाक

तळोदा तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प कोरडेठाक

Next

तळोदा : तालुक्यातील पाचही लघु सिंचन प्रकल्प जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असताना अक्षरशः कोरडेठाक आहेत. या सिंचन प्रकल्पांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. दरम्यान, पावसाअभावी तालुक्यात अजून ५० टक्केही पेरण्या झाल्या नसल्याचे चित्र आहे.

तळोदा तालुक्यातील रोझवा, पाडळपूर, सिंगसपूर, गढवली व धनपूर, असे पाच लघु सिंचन प्रकल्प आहेत. तथापि, हे सर्व प्रकल्प अक्षरशः कोरडेठाक पडले आहेत. यंदाचा पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड- दोन महिने होत आहेत. तरीही अजून जोरदार पाऊस न झाल्याने धरणांमध्ये पाणी साठलेले नाही. पूर्वी जुलै महिन्यात जोरदार पाऊस होत असे. मात्र, हा महिनादेखील संपण्याच्या मार्गावर असताना पावसाने अजूनपावेतो पाहिजे तशी धूमधडाक्यात हजेरी लावलेली नाही. साहजिकच सिंचन प्रकल्पांनादेखील मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत साधारण ३० ते ३५ टक्के जलसाठा पाचही प्रकल्पांमध्ये उपलब्ध झाला होता. यंदा तेवढे तर जाऊ द्या, पाच टक्केदेखील पाणी जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आतापासूनच भर पडली आहे. कारण सर्वच प्रकल्पांना ७० टक्के कोरडवाहू आदिवासी शेतकऱ्यांची जमीन येत असते. सध्या गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पर्जन्यमान घटत चालले आहे. शिवाय अर्धा पावसाळा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उरलेल्या कालावधीत सिंचन प्रकल्प कसे भरतील, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. आधीच पावसाअभावी शेतकऱ्यांचा पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी महागडे बी- बियाणे उधार, उसनवारीने आणून घरात ठेवले आहे. तळोदा तालुक्यात अजूनपावेतो ५० टक्के पेरणीदेखील झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांनी पेरणी उरकली आहे त्यांच्यासमोरही वेळेवर पाऊस न झाल्यामुळे दुबार पेरणी करण्याचे संकट उभे ठाकले आहे. वास्तविक यंदा १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता राज्य शासनाच्या वेधशाळेने अंदाज वर्तविला होता. साहजिकच शेतकऱ्यांमध्येसुद्धा समाधानाचे वातावरण होते. मात्र, जुलै संपण्याच्या मार्गावर असताना पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

यंदाही दुरुस्ती रखडली

तालुक्यातील पाच सिंचन प्रकल्पांपैकी रोझवा, सिंगसपूर, पाडळपूर व गढावली, असे चार सिंचन प्रकल्प अतिशय जुने झाले आहेत. त्यामुळे त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. आजतागायात त्यांची संबंधित यंत्रणेने एकदाही दुरुस्ती केलेली नाही. कुठे सांडव्याला मोठमोठे तडे गेले आहेत, तर कुठे पिचिंग लीक झाली आहे. प्रकल्पांच्या अशा दुरवस्थेमुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असते. उपलब्ध पाण्यात शेतकऱ्यांचा रबी हंगामदेखील पूर्ण होऊ शकत नसल्याचे शेतकरी सांगतात. वास्तविक सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असताना संबंधित यंत्रणा गांभीर्याने लक्ष घालायाला तयार नाही. शेतकरी सातत्याने ओरड करीत असतात. याकडे लोकप्रतिनिधींनीही साफ दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: All the five small scale irrigation projects in Taloda taluka are dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.