‘लम्पी स्किन डिसीज’ हा प्रामुख्याने गाई व म्हशींना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार असून देवी विषाणू गटातील कॅप्रिपॉक्स विषाणूमुळे हा आजार होतो. शेळ्या व मेढ्यांना हा आजार होत नाही. विदेशी वंशाच्या (पाठीवर वशिंड नसलेल्या, जसे जर्सी होल्स्टेन इत्यादी) आणि संकरित गाईंमध्ये देशी वंशांच्या गाईपेक्षा पाठीवर वशिंड असलेल्या भारतीय जातीत रोगबाधेचे प्रमाण अधिक असते. हा रोग सर्व वयोगटातील नर व मादी जनावरांत आढळतो. मात्र लहान वासरात प्रौढ जनावरांच्या तुलनेत रोगबाधेचे प्रमाण अधिक असते.
उष्ण व दमट हवामानात कीटकांची वाढ अधिक प्रमाणात होते. उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो. मात्र हिवाळ्यात थंड वातावरणामध्ये या रोगाचा प्रसार कमी प्रमाणात होतो. लम्पी स्किन डिसीज या आजाराचा रोग दर २-४५ टक्के (सर्वसामान्यपणे १०-२० टक्के), तर मृत्यू दर १-५ टक्केपर्यंत आढळून येतो.
या रोगामुळे जनावरांच्या मरतुकीचे प्रमाण नगण्य असले तरी, बाधित जनावरे अशक्त होत जातात. दूध उत्पादनात मोठी घट होऊन त्यांची कार्यक्षमता खालावते. काहीवेळा बाधित जनावरांचा गर्भपात होत असून प्रजनन क्षमतासुध्दा घटते. या रोगामुळे त्वचा खराब होत असल्याने जनावरे विकृत दिसतात. या रोगाचा प्रसार, विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने तसेच चावणाऱ्या माशा (स्टोमोक्सीस), डास, गोचीड, चिलटे यांच्यामुळे होतो.
या विषाणूंचे संक्रमण झाल्यानंतर एक ते दोन आठवड्यांपर्यंत ते रक्तामध्ये राहत असून त्यानंतर शरीराच्या इतर भागामध्ये संक्रमण होते. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होते व त्यातून इतर जनावरांमध्ये या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ जिवंत राहू शकतात. वीर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरात प्रादुर्भाव झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो. दूध पिणाऱ्या वासरांना आजारी गाईच्या दुधातून व कासेवरील व्रणातून रोगप्रसार होतो.
आजाराची लक्षणे...
बाधित जनावरांमध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे दोन ते पाच आठवडे एवढा असून या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यांतून व नाकातून पाणी येते. लसिकाग्रंथींना सूज येणे, भरपूर ताप, दुग्ध उत्पादन कमी होते. चारा खाणे, पाणी पिणे कमी होते. त्वचेवर हळूहळू १०-५० मि.मी. व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास इत्यादी भागात येतात. काहीवेळा तोंड, नाक व डोळ्यांत व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो. डोळ्यांतील व्रणामुळे चिपडे येतात, दृष्टी बाधित होते. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह किंवा कासदाह आजाराची बाधा पशूंमध्ये होऊ शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्सची संख्या कमी होते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात.