तळोद्यात 1200 मालमत्ताधारकांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 01:00 PM2018-12-19T13:00:23+5:302018-12-19T13:00:33+5:30
तळोदा : नगरपालिकेने शहराच्या चोहोबाजूने आपली हद्द वाढविल्यानंतर शहरातील सर्वच नवीन वसाहतींचा समावेश पालिकेत झाला आहे. साहजिकच जवळपास एक ...
तळोदा : नगरपालिकेने शहराच्या चोहोबाजूने आपली हद्द वाढविल्यानंतर शहरातील सर्वच नवीन वसाहतींचा समावेश पालिकेत झाला आहे. साहजिकच जवळपास एक हजार 200 नवीन मालमत्ताधारक जोडले गेले असून पालिकेला या मालमत्तांच्या करापोटी साधारण 30 लाखांचा महसूल (घरपट्टी) प्राप्त होणार आहे. दरम्यान, यंदा पालिकेने मलमत्तांवर 20 टक्के वाढीव कर आकारणी केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. याबाबत पालिकेत तक्रारीदेखील करण्यात येत आहेत.
शहराच्या चोहोबाजूंनी हद्द वाढविण्याचा पालिकेचा प्रस्ताव गेल्या आठ-दहा वर्षापासून शासनाच्या नगरविकास खात्याकडे पडून होता. याबाबत पालिका प्रशासनाने मंजुरीसाठी सातत्याने प्रय} केले होते. लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला होता. त्याचे फलित म्हणून पालिकेच्या या रखडलेल्या प्रस्तावाला नगरविकास विभागाने गेल्यावर्षी मंजुरी दिली. त्यानंतर पालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावानुसार शहराला लागून असलेल्या चारही बाजूच्या वसाहती पालिकेत समाविष्ट झाल्या आहेत. यात शहादा रस्त्यावरील प्रल्हादनगर, गोपाळनगर, प्रतापनगर, हरीओमनगर, रुपानगर, चाणक्यपुरी, मीरा कॉलनी, श्रेयसनगर, राजकुळेनगर, सीतारामनगर, विक्रमनगर, सुमननगर, जोशीनगर, रमणनगर, खटाईमाता, हातोडा रस्त्यावरील अंबादासनगर, भिकाभाऊ महाजननगर, विद्यानगरी, लक्ष्मीनगर, धनीशंकरनगर, श्रीरामनगर, गिरधरअप्पानगर अशा अनेक प्रमुख वसाहतींचा समावेश झाला आहे. पालिकेने आपली हद्द वाढविल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच नवीन वसाहतीतील नागरिकांच्या मालमत्तांचे मोजमाप पालिकेच्या कर्मचा:यांनी केले होते. मालमत्तांचे मूल्यमापन करण्यात आल्यानंतर मालमत्ताधारकांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढली आहे.
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारण एक हजार 200 नवीन मालमत्ताधारक पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेले आहेत. त्यांच्याकडून मालमत्ता (घरपट्टी) करापोटी जवळपास 30 लाख रुपयांचा महसूल पालिकेस प्राप्त होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे. असे असले तरी पालिकेनेही आपल्या हद्दीत नवीन समाविष्ट झालेल्या मालमत्ताधारकांना प्राथमिक सुविधांबाबत ठोस प्रय} करण्याची अपेक्षा आहे. कारण सुविधांबाबत नागरिकांची सतत बोंब असते. प्रशासनापासून तर लोकप्रतिनिधींपावेतो सर्वानीच यासाठी प्रय} करण्याची गरज आहे. अन्यथा आगीतून निघून फफुटय़ात पडल्याची भावना येथील नागरिकांची होईल.
नवीन वसाहतीतील नागरिकांचा
कर न भरण्याचा इशारा
शहराला लागून असलेल्या सर्वच नवीन वसाहतींचा पालिका हद्दीत समावेश करण्यात आल्यामुळे यंदापासून पालिकेकडून त्यांच्या मालमत्तांवर कर आकारणीही करण्यात आली आहे. पालिकेकडून नुकतेच या वसाहतीतील नागरिकांना घरपट्टीची बिले देण्यात आल्यानंतर वसाहतधारकांमध्येही मोठी खळबळ माजली आहे. कारण दोन हजारापासून ते पाच हजारांर्पयत त्यांना बिले देण्यात आल्यामुळे साहजिक त्यांच्यात रोष पसरला आहे. आधीच यातील बहुतांश वसाहतींमध्ये अंतर्गत रस्ते, वीज, पाणी, लाईट, गटारी यासारख्या पायाभूत सुविधा नाहीत. आजही वसाहतधारकांना सुविधांअभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. साधे पिण्याचे पाणी पालिका देऊ शकत नसल्याने खासगी कूपनलिका मालकांकडून महागडे पाणी घ्यावे लागत आहे. पालिकेने कर आकारणी करताना दुजाभाव केल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. टोलेजंग इमारतींना कमी मालमत्ता कर तर लहान घरांना जास्त घरपट्टीची रक्कम आकारल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पालिकेने आधी या सर्व नवीन वसाहतींमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तेव्हाच मालमत्ता कर घ्यावा अन्यथा याशिवाय आम्ही घरपट्टी भरणार नाही. त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.