आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची हातपंपवर धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:38 PM2020-01-04T12:38:40+5:302020-01-04T12:38:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी तेथे काही ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांसाठी तेथे काही सुविधाही करण्यात आल्या. परंतु भांगणापाणी ता.अक्कलकुवा येथील आश्रमशाळेतील पाण्याची सुविधा काही दिवसांपासून मिळत नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना हातपंपचा आधार घ्यावा लागत आहे.
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासींच्या सर्वागिण विकासासाठी तेथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात ठिकठिकाणी आश्रमशाळा देखील सुरु करण्यात आल्या आहे. त्यात भांगरापाणी येथील आश्रमशाळा ही केवळ अक्कलकुवाच नव्हे तर धडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी देखील मध्यवर्ती ठरत आहे. ही आश्रमशाळा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली असते. पाण्याच्या सुविधेनिमित्त का असेना पुन्हा ही शाळा चर्चेत येऊ लागली आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थी शाळेपासून अर्ध्या किलोमिटर असलेल्या हातपंपवर पाणी घेण्यासाठी जात आहे. ही परिस्थिती काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्यामुळे शाळेतील पाण्याची सुविधा कदाचित बंद पडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हातपंपवर धाव घ्यावी लागत आहे.
भांगरापाणी येथील हातपंप हे दुर्गम भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला आहे. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपवर जाणाºया विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे.
विद्यार्थ्यांचा हा धोका कमी करण्यासाठी आश्रमशाळेतच पिण्याच्या पाण्याची सुविधा होणे आवश्यक असल्याची अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा प्रशासन याबाबत कुठली भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.