कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर हल्ला
By मनोज शेलार | Published: June 10, 2023 07:01 PM2023-06-10T19:01:15+5:302023-06-10T19:01:29+5:30
शुक्रवारी मध्यरात्री पथकाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली.
नंदुरबार : नवापूर येथे अवैध दारूवर कारवाईसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर दगडफेक करून पथकाच्या वाहनावर दुसरे वाहनाची धडक देऊन दहशत निर्माण करण्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी नवापूर पोलिसात जमावाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणण्यासह अवैध दारू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर शहरातील एमआयडीसी परिसरात दमन बनावटीची दारू गुजरातमध्ये तस्करी करण्यासाठी साठवून ठेवल्याची माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती.
शुक्रवारी मध्यरात्री पथकाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली. ही बाब कळताच पथकावर जमावाने दगडफेक केली. वैभव गावित नामक व्यक्तीने पथकातील तातू नामक अधिकाऱ्याच्या कारवर आपली कार आदळवून दहशत निर्माण केली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नवापूर पोलिसांना घटना माहिती होताच लागलीच वाढीव बंदोबस्त दाखल झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले. सायंकाळी उशीरापर्यंत नवापूर पोलीस ठाण्यात वैभव गावित यांच्यासह दहा ते बारा जणांवर शासकीय कामात अडथळा आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या शोधासाठी तपास पथके पाठवण्यात आले अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी दिली आहे.