कनेक्टीव्हीटीअभावी बँकांचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:59 PM2019-08-03T12:59:06+5:302019-08-03T12:59:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा येथील बीएसएनएल कार्यालयाकडे वीज बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी मोबाईल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा येथील बीएसएनएल कार्यालयाकडे वीज बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी मोबाईल टॉवर बंद झाल्याने इंटरनेट कनेक्टीव्हीटीअभावी येथील दोन्ही राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज शुक्रवारी दिवसभर ठप्प झाल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथे बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. मात्र येथील बीएसएनएल कार्यालयाकडे एक लाख 38 हजार रुपयांचे वीज बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठय़ाअभावी मोबाईल टॉवर बंद झाल्याने मोबाईल व इंटरनेटचे ग्राहक वैतागले आहेत. कनेक्टीव्हीटीअभावी येथील स्टेट बँक व बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत दिवसभर कामकाज ठप्प झाल्याने परिसरातील 15 ते 20 गावातील ग्राहकांना दिवसभर ताटकळत रहावे लागले. बँकेचे व्यवहार होत नसल्याने ग्राहक व बँकांच्या कर्मचा:यांमध्येही दिवसभर वादविवाद झाले. कनेक्टीव्हीटी न मिळाल्याने ग्राहकांना व्यवहार न करताच परतावे लागल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सध्या शेतक:यांना खते, किटकनाशके घेण्यासाठी पैशांची गरज आहे. मात्र दोन दिवसांपासून पैसे उपलब्ध नसल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एटीएममध्येही पैसे उपलब्ध न झाल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.
याबाबत वीज कंपनीच सहायक अभियंता आर.एन. पाटील यांनी सांगितले की, सहा महिन्यापासून वेळोवेळी सूचना देऊन बीएसएनएलने बिल भरले नाही. बिलाची रक्कम वाढल्याने शेवटी वीजपुरवठा खंडित करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. धुळे येथील बीएसएनएलचे सरव्यवस्थापकांना दूरध्वनीवरून या प्रकाराबाबत विचारले असता ते म्हणाले की, मलाही आजच कळाले असून ही अडचण लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिका:यांनी याबाबत तातडीने दखल घेऊन वीज बिलाची रक्कम भरुन सेवा सुरळीत करण्याची मागणी मोबाईल व इंटरनेटच्या त्रस्त ग्राहकांनी केली आहे.