नंदुरबार : जागतिक आरोग्य संघटनेने जगात कोरोनाची तिसरी लाट आल्याचा दावा केला आहे. यामुळे देशासह राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातही सुविधांची पडताळणी झाली असून जिल्ह्यात तिसरी लाट आलीच तर सर्व सोयी तैनात करण्यात आल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.
मार्च ते मे या काळात जिल्ह्यात कोरोनाचे १९ हजार ९८६ रुग्ण आढळून आले होते. यातून या काळात १९ हजार ३२४ जण कोरोनामुक्तही झाले आहेत. एप्रिल महिन्यात सर्वाधिक १६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातून जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट वाढला होता; परंतु सातत्याने वाढलेले बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि सुधारित उपचार पद्धती यांमुळे जिल्ह्यातील कोरोना ९९ टक्के नियंत्रणात आला आहे. केवळ जिल्हा रुग्णालयचे नव्हे तर ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बेड तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर या ठिकाणी वाढीव बेड व व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात ऑक्सिजन प्लांटही सुरू करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दोन प्लांट सज्ज
आरोग्य विभागाने ऑक्सिजन तुटवडा भासू नये यासाठी २० मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित केले आहेत. १० ऑक्सिजन प्लांट प्रस्तावित असून यासाठी ४ कोटी ७३ लाख रुपयांचा खर्चही मंजूर आहे. या खर्चातून ८.११ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. जिल्हा रुग्णालयात २५८, कोविड हाॅस्पिटलमध्ये १६१, कोविड केअर सेंटरमध्ये ८८९, रेल्वे रुग्णालयात ३७८ तर ग्रामीण भागात ५ हजार असे एकूण ६ हजार ७१३ बेड तयार आहेत.
रुग्णसेवेसाठी ३०० पेक्षा वैद्यकीय अधिकारी तैनात आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची संख्या आता ६४० एवढी आहे.
नंदुरबार ३५०, नवापूर व धडगाव येथे प्रत्येकी ९०, शहादा व तळोदा येथे प्रत्येकी ५०, तर अक्ककुवा येथे ६० ऑक्सिजन बेड सध्या सज्ज आहेत.
आठ बालरोगतज्ज्ञ
संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाकडून आठ बालरोगतज्ज्ञ नियुक्त केले आहेत. धडगाव व अक्कलकुवा येथे प्रत्येकी एक, नंदुरबार येथे चार तर नवापूर येथे दोन असे आठ तज्ज्ञ सज्ज आहेत. तळोदा व शहादा येथे बालरोगतज्ज्ञ नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ऑक्सिजन बेड तयार
लहान बालकांना संसर्ग झालाच तर त्यांना स्वतंत्र अशी सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी ८८० बेड विनाऑक्सिजन, ६४० ऑक्सिजन, तर ११२ व्हेंटिलेटर्स आहेत. अक्कलकुवा येथे ६०, धडगाव ९०, शहादा ८०, तळोदा ५०, नवापूर ११०, तर नंदुरबार येथे सर्वाधिक ४९० बेड हे लहान बालकांसाठी सज्ज आहेत.
जिल्हा रुग्णालयासोबतच ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात बेड वाढले आहेत. तिसरी लाट हा संभाव्य धोका आहे. आरोग्य विभाग सज्ज आहे. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
-डाॅ. एन. डी. बोडके,
जिल्हा आरोग्याधिकारी, नंदुरबार.