सोमवारी अकरा वाजेच्या सुमारास मालेगावहून बडोदाकडे जाणाऱ्या बसवरील (क्रमांक जीजे १८ झेड ६८५८) चालकाचे रायपूर नदीजवळ नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. बसमधील प्रवाशांना बसचा पुढील काच फोडून बाहेर काढण्यात आले. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. अपघातग्रस्तांना परिसरातील नागरिकांनी आपल्या खासगी वाहनाने उपचारासाठी दाखल केले. उर्वरित प्रवाशांना महाराष्ट्र परिवहन विभागाच्या बसने नवापूर बसस्थानकावर रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण, नरेंद्र नाईक, तनपुरे, विक्की वाघ यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. तसेच नवापूर पिंपळनेर मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवापूर-पिंपळनेर रस्ता अरुंद असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात. या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
नवापूर तालुक्यातील रायपूर, चौकी, भामरमाळ, बोरझर, वडकळंबी या गावातील ग्रामस्थ तसेच युवकांनी अपघात होताच घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढले व मिळेल त्या साधनाने नवापूर रुग्णालयात पाठविले.