शेल्टर होममधून पळालेले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 09:16 PM2020-04-27T21:16:19+5:302020-04-27T21:16:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शेल्टर होम मधून पळालेल्या आठ युवकांना खातगाव रेल्वे स्थानकावरुन एलसीबीच्या पथकाने काही तासातच ताब्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : शेल्टर होम मधून पळालेल्या आठ युवकांना खातगाव रेल्वे स्थानकावरुन एलसीबीच्या पथकाने काही तासातच ताब्यात घेतले आहे़ जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप मध्यप्रदेशातील या मजुरांनी दोन दिवसांपुर्वीच केला होता.
लॉकडाऊन दरम्यान सहा एप्रिल रोजी मध्यप्रदेशातील ३४ युवक सुरत येथून इंदौरकडे पायी जात असतांना राज्याच्या सीमेवर नवापूर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले होते़ त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना सीमा परिवहन तपासणी नाक्यावर उभारलेल्या शेल्टर होममध्ये रवाना करण्यात आले होते़
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून गुजरात राज्यातून ३४ मजुर पायी घराकडे निघाले होते. या युवकांनी २६ रोजी तेथे निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता. प्रशासन खडबडुन जागे झाल्याने अधिकाऱ्यांकडून त्याची तातडीने दखल घेत त्यांची भेट घेऊन सुविधा पुरवण्याचा उपाय म्हणुन त्यांना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वसतीगृहात ठेवण्यात आले होते. रविवारी रात्री ते पहाटेच्या दरम्यान ३४ पैकी आठ युवकांनी दरवाजाची कडी तोडून तेथून रेल्वे रुळाची वाट धरुन पलायन केले होते. आठ जण तेथून पोबारा करुन निघुन गेल्याने त्यांचा शोध सुरु झाला. अवघ्या काही तासात एलसीबीच्या शाखेकडून नवापुर पासुन सुमारे ३० किलोमीटर अंतरावर खातगाव रेल्वे स्थानकावरुन त्या आठही जणांना ताब्यात घेऊन पुन्हा नवापूर येथे आणण्यात आले. ही कारवाई पोलीस निरिक्षक किशोर नवले, पोलीस उप निरीक्षक योगेश राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गोरे, महेंद्र नगराळे, दादा वाघ, पोलीस नाईक प्रमोद सोनवणे, शांतीलाल पाटील, राकेश वसावे, महिला पोलीस नाईक पुष्पलता जाधव, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तोरवणे, राजेंद्र कटके, विजय ढिवरे, यशोदीप ओगले व सतीश घुले यांनी केली.
नवापुर तहसील प्रशासन सेवाभावी संस्थांच्या मदतीने शेल्टर होममध्ये अन्न पुरवठा करण्यावर भर देत आहे़ मजूरांपैकी कोणाला काही काम देता येईल का, यावरही विचार सुरु आहे़ कौशल्यानुसार रोजगार देण्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे़