नवापुरात नागरी वस्तीत हिंस्त्र प्राण्यांमुळे दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 11:46 AM2019-03-03T11:46:23+5:302019-03-03T11:46:42+5:30
नवापूर : शहरातील नागरी वस्तीत शनिवारी दोन हिंस्त्र प्राणी दिसून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली. ते प्राणी बिबट्या असल्याचे ...
नवापूर : शहरातील नागरी वस्तीत शनिवारी दोन हिंस्त्र प्राणी दिसून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली. ते प्राणी बिबट्या असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.
शहरात औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यावर लाखाणी पार्क ही नव्याने विकसित झालेली नागरी वसाहत आहे. मार्च महिन्यात उन्हाचा चटका बसत असल्याने वस्तीतील रहिवासी दुपारच्या सुमारास घरातच होते. दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास काही नागरिकांना बांधकाम सुरु असलेल्या एका घराजवळ एक हिंस्र प्राणी पाणी पित असल्याचे व दुसरा त्याच्या मागे उभा असल्याचे दिसून आल्याने त्यांची भंबेरी उडाली. लाखाणी पार्क भागात वाघ आल्याचे वनविभागास कळविण्यात आले. वनविभागाचे एस.ए. खैरनार, अशोक पावरा, सतीश पदमल, राजेंद्र चित्ते व सहकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच एक जवळच्या उसाच्या शेतात तर दुसरा लहान चिंचपाडाकडे निघून गेला. वन कर्मचाऱ्यांनी प्राण्यांच्या पायाचे ठसे घेतले. त्यावरुन ते बिबट्या असल्याचे सांगण्यात आले.