पोषण आहार सुरू झाल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:37 AM2017-09-24T11:37:08+5:302017-09-24T11:37:08+5:30
अंगणवाडी कर्मचारी संप मागे : 15 दिवसांपासून होता ठप्प, बचत गटांचा घेतला आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अंगणवाडी कर्मचा:यांच्या संपामुळे कुपोषीत बालक, गर्भवती व स्तनदा मातांना देण्यात येणारा पुरक पोषण आहाराचा गेल्या 15 दिवसांपासून खंडित झालेला पुरवठा अखेर शनिवारपासून सुरळीत झाला. अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेतला गेल्याने आहार पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
अंगणवाडी कर्मचा:यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. आंदोलन मागे घेतले जाते किंवा नाही याबाबत अनिश्चितता होती. परिणामी अंगणवाडींमार्फत सहा वर्षाआतील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आहार पोषण व आरोग्य सेवा विषयीच्या विविध सेवा रखडल्या होत्या. परिणामी संबधितांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेता शासनाने चार दिवसांपूर्वी तातडीने अध्यादेश काढून आहार पुरवठा खंडित होऊ नये यासाठी तातडीने पाऊले उचलण्याच्या सुचना संबधित जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या.
जिल्ह्यात हजारो होते वंचित
जिल्ह्यातील शून्य ते सहा वयोगटातील एक लाख 65 हजार बालके, 26 हजरापेक्षा अधीक गरोदर महिला, स्तनदा माता व किशोर मुली या सेवांपासून वंचीत राहत होत्या. यामुळे सहा वर्षाआतील बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
शिवाय गरोदर व स्तनदा मातांना योग्य आहार आणि आरोग्य सेवा वेळेवर पोहचू न शकल्यास मोठी समस्या निर्माण होणार होती. त्यादृष्टीने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी पाऊले उचलली होती. गेल्या आठवडय़ात जिल्हाधिका:यांनी घेतलेल्या नवसंजीवनीच्या बैठकीत देखील याबाबत सुचना दिलेल्या होत्या.
आशा सेविकांचा आधार
अंगणवाडी कर्मचारी ज्या सेवा पुरवीतात त्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात पुरविण्यासाठी आशा सेविकांचा आधार घेतला जाणार होता. तसा अध्यादेश चार दिवसांपूर्वी महिला व बालविकास विभागातर्फे काढण्यात आला. या कामासाठी अंगणवाडी सेविकेचा दैनिक मानधनाएव्हढी रक्कम आशा सेविकेला मानधन म्हणून दिली जाणार होती. काही ठिकाणी बचत गटांचा आधार घेण्यात आला होता.
परंतु शुक्रवारी सायंकाळी अंगणवाडी सेविकांचा संप मागे घेण्यात आला. परिणामी शनिवारपासून जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वेळेवर आहार पुरवठा करण्यात आल्याचा दावा जिल्हा परिषद आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केला आहे