लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून निधीअभावी रखडलेल्या तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील ७५० घरकुल योजनेच्या घरांसाठी साधारण एक कोटी रुपयांचा निधी संबंधित यंत्रणेने पंचायत समितीकडे वर्ग केल्यामुळे बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता प्रशासनाने लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम तातडीने टाकायची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी अपेक्षा लाभार्थींनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेतून तळोदा तालुक्यात साधारण ९५० लाभार्थ्यांनी आपल्या घरकुलाचे काम हाती घेतले आहे. या लाभार्थ्यांनीदेखील युद्धपातळीवर प्रयत्न करून काम सुरू केले आहे. कुणी लेंटल पावेतो, तर कुणी पायाचे काम केले आहे. तथापि, गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पैशांअभावी लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम बंद केले होते. साहजिकच घरकुले रखडली होती. पैशांसाठी लाभार्थी सतत पंचायत समितीकडे हेलपाटे मारत असत. या वेळी वरूनच पैसा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे लाभार्थी अक्षरशः वैतागला होता. वास्तविक पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने या लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या बांधकामाचे नियमानुसार मूल्यांकनसुद्धा केले होते. शिवाय निधीसाठी जिल्हा परिषदेच्या डीआरडीकडे सातत्याने प्रयत्न केले होते. मात्र, काही पंचायत समितीत घरकुलाच्या झालेल्या अनियमिततेबाबत इतर लाभार्थ्यांची रक्कम थकविल्याचे बोलले जात होते. प्रशासनाने याप्रकरणी पूर्ण खातरजमा केल्यानंतर आता लाभार्थ्यांच्या हप्त्यानुसार रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार तळोदा पंचायत समितीकडेही साधारण १०० कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता गेल्या अडीच महिन्यांपासून रखडलेल्या घरांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे; परंतु पंचायत समितीच्या प्रशासनाने त्यांच्या खात्यावर रक्कम तातडीने टाकायची प्रक्रिया हाती घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
२०० घरांचा निधी प्रलंबितच
प्रशासनाने तालुक्यातील ७५० घरकुलांच्या निधीची तरतूद केली असली तरी अजून २०० लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित ठेवले आहे. परिणामी त्यांना निधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. वास्तविक पैशांअभावी या लाभार्थींची घरकुले रखडली आहेत. त्यांनी आपल्याकडील असलेली पुंजी वापरली. शिवाय उसनवार रक्कम घेऊन घरकुलात टाकली आहे. साहजिकच त्यांना कर्ज फेडण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आमची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन निधीचा मार्ग मोकळा करावा, अशी त्यांची मागणी आहे.
तळोदा तालुक्यातील घरकुलांच्या अनुदानाचा निधी प्राप्त झाला असून, संबंधित लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या बांधकामाच्या मूल्यांकनानुसार त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. साधारण ७५० घरकुलांची रक्कम मिळाली आहे.
- रोहिदास सोनवणे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तळोदा
पैशांअभावी गेल्या दोन महिन्यांपासून घरकुलाचे बांधकाम बंद पडले आहे. जवळील पैसेदेखील लावून टाकले आहे. आता प्रशासनाकडे निधी आला असल्याची माहिती मिळाली असून, ती तातडीने आमच्या खात्यात वर्ग करावी. - वृंदावन ठाकरे, लाभार्थी, बोरद