सविस्तर वृत्त असे की, सुलवाडे प्राथमिक केंद्राच्या आवारात शुक्रवारी रात्री कुत्रे भुंकत असल्याचा आवाज आला. परंतु, जवळच असलेल्या आरोग्यसेविका शोभा भामरे यांच्या निर्दशनास आल्यावर त्यांनी बाहेर येऊन पाहणी केली असता अंधार जास्त प्रमाणात असल्याने त्यांना काही दिसून आले नाही. परंतु, सकाळी उठल्यावर मोकाट फिरत असलेल्या घोड्यावर अचानक हिंस्त्र प्राण्याने हल्ला चढवून घोडा ठार केल्याची बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
एका शिपायावर भार
प्राथमिक आरोग्य केंद्र सुलवाडे येथे एकूण शिपायाच्या चार जागा असून, त्यापैकी तीन जागा रिक्त असल्याने एका शिपायावर रात्र-दिवस ड्युटी करण्याची वेळ व संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार आहे. हा कर्मचारी निवासस्थानात राहतो. रात्री-अपरात्री प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिला येत असताना अचानक जर हिंस्त्र प्राण्याने हल्ला चढविला तर मोठी दुर्दैवी घटना घडू शकते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.