जिल्ह्याचा व आदिवासी समाजाचा विकास काँग्रेसनेच केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:44 PM2020-01-04T12:44:57+5:302020-01-04T12:45:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : काँग्रेस पक्षाने नंदुरबार जिल्ह्याला आग्रस्थानी ठेवले आहे. आधार कार्ड योजनेची सुरूवातही जिल्ह्यातून झाली. आदिवासींच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : काँग्रेस पक्षाने नंदुरबार जिल्ह्याला आग्रस्थानी ठेवले आहे. आधार कार्ड योजनेची सुरूवातही जिल्ह्यातून झाली. आदिवासींच्या विकासाचे व्रत काँग्रेसने स्विकारले आहे. त्यामुळे या खात्याचे मंत्रीपद जिल्ह्याला देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बिलबारा, ता.नवापूर येथे केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमराण व भरडूसह संपूर्ण तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ नवापूर तालुक्यातील बिलबारा येथे झालेल्या जाहीर सभेत मंत्री थोरात बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक, अमित देशमुख, आमदार शिरीष नाईक, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, उमराण गटातील उमेदवार अजित नाईक, भरडू गटाचे उमेदवार दीपक नाईक, राया मावची, दारासिंग गावीत, सरपंच सुदाम वळवी, सुरेश वळवी, आरीफ बलेसरीया, अय्युब बलेसरीया, अजय पाटील आदी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, सुरूपसिंग नाईक यांनी केलेल्या विकास कामांमुळे आमदार शिरीष नाईक विधानसभेत निवडून आले. त्यांनी आदिवासी समाजाचा विकास केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते नाईक यांच्या तब्येतची नेहमी विचारपूस करीत असतात. काँग्रेस पक्ष आदिवासी समाजावर प्रेम करतो. तसेच आदिवासी महिलांना संरक्षण, युवकांना रोजगार, विविध योजना देण्यात येतील त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असे त्यांनी सांगितले.
स्व.विलासराव देशमुख नेहमी सांगायचे काँग्रेस सरकारमध्ये आमचे मंत्रीपद निश्चित आहे की नाही हे माहीत नसायचे. परंतु प्रत्येक मंत्रीमंडळात मात्र सुरूपसिंग नाईक यांचे मंत्रीपद कायम असायचे. काँग्रेस पक्षाने आदिवासी नेते तथा आदिवासी जनतेला न्याय दिला आहे. त्यांनी पक्ष वाढवला आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विकास केला. त्यामुळे त्यांची भूमिका ‘लयभारी’ राहिली आहे, असे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
पक्षाने विविध मंत्रीपदे देवून जिल्ह्याचा विकास केला आहे. येत्या काळातही आदिवासी विकास खाते जिल्ह्यात मिळाले तर आदिवासींचा विकास नक्की होईल, असे प्रतिपादन आमदार शिरीष नाईक यांनी केले.
मंत्री अमित देशमुख यांना भेटतांना माजी आमदार सुरुपसिंग नाईक यांनी स्व.विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब थोरात यांनीही सुरुपसिंग नाईक यांच्यासोबत केलेल्या कामातून मोठे अनुभव मिळाल्याचे सांगितले. यावेळी नाईक यांचे उमेदवार दोन्ही उमेदवार पूत्र व आमदार पूत्र उपस्थित होते.