नंदुरबारात भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:55 AM2019-02-14T11:55:09+5:302019-02-14T11:55:16+5:30
तब्बल पाच दशकांहून अधिक काळ काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार लोकसभा मतदार संघ गेल्या पाच वर्षापूर्वी भाजपने काबीज करून काँग्रेसला ...
तब्बल पाच दशकांहून अधिक काळ काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार लोकसभा मतदार संघ गेल्या पाच वर्षापूर्वी भाजपने काबीज करून काँग्रेसला ‘ब्रेक’ दिला आहे. त्यामुळे या मतदार संघात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते सज्ज झाले असून, गेल्या महिन्याभरापासून गट, तट, मनाने विखुरलेले कार्यकर्ते आता एकत्र येवू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या शहादा येथील काँग्रेस मेळाव्यात त्याची प्रचिती आली.
नंदुरबार लोकसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत विद्यमान खासदार डॉ.हिना गावीत यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळवून एक नवा इतिहास रचला होता. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून या मतदार संघातील काँग्रेसचे कार्यकर्ते चलबिचल झाले होते. दुसरीकडे या मतदार संघात नवीन चेहरा असलेल्या व तरूण खासदार डॉ.हिना गावीत यांनी पाच वर्षात आपला प्रभाव मतदारांवर पाडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. त्यासाठी हायमस्ट दिव्यांची योजना असो की, उज्वला गॅस योजना असो या त्यांच्यासाठी खूप कामी आल्यात. शिवाय जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व त्यांचे पिता डॉ.विजयकुमार गावीत यांचे राजकीय वर्चस्वही त्यांच्याकामी आले. त्यामुळे भाजपने या मतदार संघात बऱ्यापैकी पाळेमुळे रोवले आहेत. त्याला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.
मतदार संघात काँग्रेसचे कार्यकर्ते गावो - गावी असले तरी ते विखुरलेले आहेत. परंतु त्यांना चैतन्य देण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे गेल्या काही महिन्यांपूर्वीचे चित्र होते. त्यातच काँग्रेसचे प्रभावी नेते व जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आजारपणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयात आहेत. ज्येष्ठ नेते माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत व माजीमंत्री आमदार सुरूपसिंग नाईक यांचा जनमाणसावर पकड असली तरी वयोमानाने त्यांनाही मर्यादा आली आहे. आमदार अॅड.के.सी .पाडवी व माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी हे काँग्रेसचे दमदार नेते असले तरी त्यांनी आपापल्या विधानसभा मतदार संघातच अधिक लक्ष घातले होते. या पार्श्वभूमिवर काँग्रेसची नंदुरबार लोकसभा मतदार संघातील पकड कमी होते की, काय अशी स्थिती काही महिन्यांपूर्वी होती. पण त्यावर मात करीत काँग्रेसने आपली स्थिती मजबूत करण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात काही अंशी यशही येत आहे. जिल्हाध्यक्ष रुग्णालयात असल्याने तातडीने पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्षपदी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पुरूषोत्तम पाटील यांची नियुक्ती केली. त्यानुसार दीपक पाटील यांनी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसतर्फे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आमदार के.सी. पाडवी व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत यांच्या नावांचे शिफारस करण्यात आली आहे. पक्षनिरीक्षक व पदाधिकाºयांच्या उपस्थितीत गेल्या महिन्याभरात विविध मेळावे झालेत. नुकताच शहादा येथे मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांचा एकत्रित मेळावा झाला. या मेळाव्यात काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास अधिक बळावलेला दिसून आला. कार्यकर्त्यांची विस्कटलेली घडी पुन्हा जुळून येत असल्याचेही दिसून आले. त्यामुळे आज तरी भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस सज्ज होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे भाजपतर्फेही विविध मेळावे, निवडणुकीचे नियोजन सर्व आघाडींवर सुरू आहे. उमेदवार कोण राहतील याबाबत अद्याप अधिकृतपणे निश्चिती नसली तरी मतदार संघातील कार्यकर्ते मात्र निवडणुकीसाठी सक्रिय झाले असून, थंडी कमी होवून जस जसे तापमान वाढत आहे. तस तसे निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे.