कोरोना आटोपला; इतर आजाराच्या शस्त्रक्रियांचा मार्ग मोकळा झाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:29 AM2021-09-13T04:29:09+5:302021-09-13T04:29:09+5:30
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दीड वर्षापासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास गती देण्यात येत असल्याने इतर आजारांवरच्या शस्त्रक्रिया तसेच ...
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात दीड वर्षापासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास गती देण्यात येत असल्याने इतर आजारांवरच्या शस्त्रक्रिया तसेच उपचार काहीसे मागे पडले होते; परंतु गेल्या दोन महिन्यांत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याने दीड वर्षांपासून थांबलेल्या शस्त्रक्रिया व उपचारांना सुरुवात झाली आहे.
यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या समस्या दूर झाल्या आहेत. अनेकांना दीड वर्षापासून वेटिंगवर ठेवल्याने त्यांचे आजार बळावण्याची शक्यता होती; परंतु कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांच्या शस्त्रक्रियांना ब्रेक दिला गेला होता. गेल्या दोन महिन्यांपासून शस्त्रक्रियांना पूर्णपणे वेग देण्यात येत असल्याची माहिती दिली गेली आहे. यातील ७० टक्के रुग्ण हे बरे होऊन घरीही परत गेल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
शस्त्रक्रियेसाठीची प्रतीक्षा संपली
जिल्हा सामान्य रुग्ण आजघडीस पूर्ण क्षमतेने सुरू आहे. रुग्णालयाच्या सर्व वाॅर्डांत रुग्ण भरती आहेत. रुग्णालयात ५०० च्या जवळपास रुग्ण भरती करण्यात आले आहेत. हर्निया, पोटाचे विकार, छातीचे आजार, ॲपेंडिक्स, सांधेरोपण शस्त्रक्रिया यासह इतर आजारांवरच्या शस्त्रक्रिया येथे सुरू झाल्या आहेत. गेल्या दीड वर्षात थांबवून ठेवलेल्या सर्व शस्त्रक्रियांना गती देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रामुख्याने अपघातानंतर रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येतात. यातील हाड, सांधे तुटलेले किंवा इतर मोठी इजा झालेल्या अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
रुग्णालय प्रशासनाने यासाठी तज्ज्ञ डाॅक्टर नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले जाते.
जिल्हा रुग्णालयात प्रामुख्याने हर्निया, ॲपेंडिक्स, पोटाचे इतर आजार, शरीरातील गाठी यासह विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. इतर आजारांच्या सर्व शस्त्रक्रियांबाबत तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेतला जातो. कॅन्सर किंवा इतर गंभीर आजारावरच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना राज्यातील इतर भागात पाठवले जाते. त्यासाठी नियोजन केले जाते.
सर्व काही सुरळीत
दरम्यान याबाबत जिल्हा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. के.डी. सातपुते यांना संपर्क केला असता, सर्व काही सुरळीत सुरू असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू झाल्या आहेत. प्लान केलेल्या शस्त्रक्रियांची माहिती आधीच रुग्णांना देऊन त्यांना बोलावून घेतले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.