रस्ता वाहून गेल्याने धोकेदायक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:57 AM2020-07-01T11:57:36+5:302020-07-01T11:58:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे गावालगत गेलेल्या भेंडवा नाल्याजवळ नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशीचा भराव व ...

Dangerous condition due to road congestion | रस्ता वाहून गेल्याने धोकेदायक स्थिती

रस्ता वाहून गेल्याने धोकेदायक स्थिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील मामाचे मोहिदे गावालगत गेलेल्या भेंडवा नाल्याजवळ नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे फरशीचा भराव व रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहे. याठिकाणी कारसारखे वाहन काढतानाही त्रास होत आहे. वारंवार मागणी करुनही याठिकाणी संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे फरशीचे बांधकाम झाले नसल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. भराव व रस्ता वाहून गेल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहादा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर मामाचे मोहिदे गावाच्या पूर्व दिशेकडून सोनवद, कहाटूळ, जयनगर, लोंढरे, वडाळी, फेस, बामखेडा, शिरपूर असा मार्ग जातो. बऱ्याचवेळा शहादा-शिरपूर रस्ता नादुरूस्त राहिल्यास अथवा रहदारी खोळंबली तर या मार्गाने जड वाहने ये-जा करतात. मोहिदे गावापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर जयनगर येथे श्री हेरंब गणेशाचे मंदिर असल्याने भाविकांची नेहमी ये-जा सुरू असते. मोहिदे गावालगत भेंडवा नाला गेला आहे. डोंगरगाव, वडछील, पुनर्वसन, उभादगड या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भेंडवा नाल्याला पाणी येते. मोहिदे गावालगत असलेल्या फरशीवरून पाणी वाहते. त्यामुळे तास-दोन तास वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. गेल्यावर्षी या फरशीलगत रस्त्याचे निकृष्ट काम झाल्यामुळे मोठा बोगदा पडला होता. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरता मातीचा भराव केला होता.
मोहिदे गावाच्या पूर्वेला जय जवान जय किसान माध्यमिक शाळेच्या इमारीला लागूनच भेंडवा नाल्यास पावसाळ्यात पाणी येते. या शाळेजवळील फरशीवरुनही पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अवघड होते. तसेच शेतमजुरांनाही शेतात कामासाठी जाण्यासाठी अडचणी येतात. मोहिदे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रार देऊन व प्रत्यक्ष भेटून भेंडवा नाल्यावरील फरशीची उंची वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याला पूर आल्याने या फरशीजवळील भराव व रस्ता वाहून गेला आहे. खचलेल्या रस्त्यालगत टाकलेला मुरूमही पाण्यात वाहून गेल्याने रस्त्यावरून कारसारखे वाहन काढणेही कठीण झाले आहे. अजून जोरदार पाऊस होऊन पूर आला तर उरलेला रस्ताही वाहून जाऊन या मार्गावरील वाहतूक बंद होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी संबंधित फरशीच्या ठिकाणी खचलेल्या रस्त्याचे काम त्वरित युद्धपातळीवर करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.

Web Title: Dangerous condition due to road congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.