नंदुरबार : भारताच्या उत्तर-पश्चिम दिशेला वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण झाला असल्याने जिल्ह्यासह राज्यात ढगाळ हवामानाची निर्मिती झालेली दिसून येत आहे़ गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ताशी १५ किमी वेगाने वारे वाहत आहेत़ ढगाळ हवामान असल्याने जिल्ह्यातील किमान व कमाल तापमानात २ ते ३ अंशाने घट बघायला मिळाली़नंदुरबारात बुधवारी कमाल ३३ तर किमान १७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली़ बुधवारी जिल्ह्यात संपूर्ण दिवस ढगाळ हवामान होते़ त्यासोबतच वाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव जाणवत असल्याने अनेक ठिकाणी धुळीची समस्या निर्माण झाली होती़साधारणत: पुढील तिन दिवस ढगाळ हवामान राहून २ ते ४ मार्च दरम्यान किमान तापमानात पुन्हा काहीशी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे़ दरम्यान, हिमालयाच्या उत्तर-पश्चिम दिशेला चक्रिवादळापूर्वीची स्थिती निर्माण झाली आहे़ या परिसरात हवेचा द्रोणीय वर्तुळ निर्माण झाला असल्याने दोन ठिकाणी वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसून येत आहे़ साधारणत: २७ फेब्रुवारीपर्यंत ही स्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता़ परंतु अजून पुढील दोन दिवस तरी हीच स्थिती कायम राहणार असल्याचे ‘आयएमडी’च्या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीवरुन कळते़या परिस्थितीमुळे उत्तरेकडील प्रदेशात जोरदार पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे़ त्यामुळे परिणामी पाऊस झाल्यास राज्यात मुख्यत्वे विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़ खान्देश तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाचा धोका नसला तरीदेखील काही दिवस ढगाळ हवामान कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे़ गेल्या आठवड्यापासून उत्तरेकडील शितलहरींचा प्रभाव कमी झालेला होता़ तसेच बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारेदेखील मोठ्या प्रमाणात वाहण्यास सुरुवात झालेली होती़ त्यामुळे मध्यंतरी जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात किमान व कमाल तापमान वाढ झालेली दिसून आली़ परंतु हिमालयाजवळ दोन ठिकाणी पुन्हा वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसून आल्याने हवामानात वेगाने बदल होताना दिसून येत आहे़ येत्या काही दिवसात तापमानातही मोठ्या प्रमाणात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे़पश्चिमेकडून वाहताय वारेगुजरात राज्याला लागून असलेल्या अरबी समुद्राकडून ताशी ५० ते ६० किमी प्रतिवेगाने वारे वाहत आहेत़ पश्चिम राजस्थानातूनही वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने परिणामी राज्यात हवेच्या वेगात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची स्थिती आहे़ अफगाणिस्तान तसेच मध्ये पाकिस्तानाच्या वर्तुळात चक्रीवादळाला पोषक अशी वातावरणाची निर्मिती झाली आहे़ त्यामुळे पुढील काही दिवस अशीच स्थिती कायम राहिल्यास भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्येही गारपीठ किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़दरम्यान, पुढील चार दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ तसेच आकाशदेखील निरभ्र राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे़
ढगाळ हवामानामुळे तापमानात घट : वेस्टर्न डिस्टर्बन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:38 AM