ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:39 PM2020-09-29T12:39:07+5:302020-09-29T12:39:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ओबीसी समाजात इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये, तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ओबीसी समाजात इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये, तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी बचाव आंदोलन समिती नंदुरबार जिल्हातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांना देण्यात आले.
निवेदना पुढे म्हटले आहे की, ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य व केंद्रसरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असून या बाबत कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ओ.बी.सी. जातनिहाय जनगणना झालीच पाहीजे. कोणाच्याही आरक्षण मागणीस आमचा विरोध नाही परंतु ओ.बी.सी.च्या आरक्षणास धक्का न लावता आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. अनेक वर्षांपासून कर्मचारी शासनाच्या विविध खात्यांमध्ये भरती नसल्याने लाखो सुशिक्षीत बेरोजगार निर्माण झाले आहेत.
आरक्षण भरतीचा कोटा रिझर्व्ह ठेवून उर्वरित भरती सुरु ठेवावी. ओ.बी.सी. विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर वसतीगृह व प्रशिक्षण केंद्र स्थापन करावीत ओबीसींसाठी क्रिमिलेयरची अट रद्द करावी. धनगर, धोबी, वंजारी, गुरव, एस.सी., एन.टी., आदी समाजाचे स्थगित असलेले सर्वच प्रश्न मार्गी लावावीत. आमच्या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून ओबीसी समाजास न्याय द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्यावतीने महाराष्ट्रभर कायदेशिर मागार्ने पाठपुरावा होत आहे.
राज्यशासन व केंद्र शासनाने मागण्यांवर अंमलबजावणी न केल्यास ओबीसी समाज मोठया प्रमाणात रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा अशा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सुरेश माळी, एजाज बागवान, हाजी अस्लम चौधरी, राजेंद्र वाघ, मनोज गायकवाड, आनंदा माळी, मधुकर माळी, सोमनाथ शिंपी, वासुदेव माळी, यादव माळी आदींच्या सह्या आहेत.