शेवाळी-नेत्रंग महामार्ग दुरूस्तीला ३८ कोटी निधी देऊनही खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:50 PM2020-09-28T12:50:13+5:302020-09-28T12:50:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातून जाणाऱ्या शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले असून खड्डे बुजवण्यासाठी शासनाने मंजूर केलेले ३८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातून जाणाऱ्या शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले असून खड्डे बुजवण्यासाठी शासनाने मंजूर केलेले ३८ कोटी खर्च करुनही खड्डे कमी न होता वाढत आहेत़ याबाबत नागरिकांनी महामार्ग प्राधिकरणकडे तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़
नंदुरबार शहरातील धुळे चौफुली मार्गाने करण चौफुली व पुढे तळोदा रस्त्याला मिळणाºया महामार्गावर करण चौफुली आणि तळोदा रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत़ काही दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्यासाठी बांधकाम विभागाने येथे मुरूम टाकला होता़ हा मुरुम वाहून गेला आहे़ यानंतर खड्डे उघडे पडले असून अवजड वाहने याठिकाणी फसत असून दुचाकीस्वार खड्ड्यात पडून अपघात होत आहे़ महाराष्ट्र राज्य सार्वजिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विंगला शेवाळी ते नेत्रंग या महामार्गाची जबाबदारी शासनाकडून सोपवण्यात आली आहे़ हा महामार्ग विस्तारीकरणाचे काम अद्याप पूर्णपणे सुरू झालेले नसले तरी सप्टेंबर २०१९ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दुरूस्ती व बळकटीकरण यासाठी ३८ कोटी रूपयांचा निधी मंजूर करुन काम सुरू करण्याचे सूचित केले होते़ यात ७ कोटी ७२ लाख रूपये हे निव्वळ २०२० च्या पावसाळ्यात खड्डे निर्माण होवू नये व झाल्यास ते बुजवता यावे यासाठी दिले आहेत़ यासाठी बांधकाम विभागाच्या महामार्ग प्राधिकरणने दोन ठेकेदार नियुक्त करुन काम सुरू करण्याची अपेक्षा होती़ परंतु प्रत्यक्षात मात्र खड्डे बुजवण्याचा आव आणत काम झाल्याचे निर्दशनास आले आहे़ परिणामी अक्कलकुवा तालुक्यालगत गुजरात हद्द ते शेवाळीपर्यंत रस्ता दुरूस्तीचे काम हे नावाला असल्याचे दिसून आले आहे़ एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळूनही नंदुरबार शहरातील दोन्ही चौफुल्यांवरचे खड्डे न बुजवले गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ काही ठिकाणी रस्ता काम न्यायालयीन कक्षेत असले तरीही मूळ रस्ता दुरूस्तीत न्यायालयाने कोणताही ‘स्टे’ दिलेला नसतानाही न्यायालयाचे कारण देत काम टाळले जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे़ दरम्यान या महामार्गाचा नवीन डीपीआर शासनाकडे संमतीसाठी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ प्रकल्पाचा खर्च काही हजार कोटीत वाढला असल्याने महामार्गाचे विस्तारीकरण अथवा चौपदरीकरण प्रस्तावित आहे़