धडगाव ग्रामीण रुग्णालयात होतोय रुग्णांच्या जीवाशी खेळ, उपचाराआधीच रुग्णांना केले जातेय रेफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:35 AM2021-09-15T04:35:42+5:302021-09-15T04:35:42+5:30
धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभारात दिवसेंदिवस वाढ असून रुग्णांची हेळसांड केली जात आहे. येथील आरोग्य यंत्रणा पूर्णत: विस्कळीत ...
धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभारात दिवसेंदिवस वाढ असून रुग्णांची हेळसांड केली जात आहे. येथील आरोग्य यंत्रणा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. रात्री रुग्णालयात डॉक्टर न थांबणे, रुग्णाशी व त्यांच्या नातेवाईकांशी अरेरावी करणे, वेळेवर किंवा योग्य उपचार न करणे, रुग्णालयात उशीराने येणे यासारखे प्रकार वाढत चालले आहे. या सर्व गोष्टींवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. फक्त मनमानी कारभार चालला आहे. मात्र यात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. यात सुधारणा न झाल्यास आरोग्य यंत्रणा वाऱ्यावरच राहील. त्यामुळे धडगाव ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेत सुधारणा करुन रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा, अशी मागणी होत आहे.
सोमवारी घडलेली घटना दुर्देवी असली तरी ही काय पहिलीच घटना नाही. डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे अशा अनेक घटना याआधी झालेल्या आहेत. स्वत:वरील जबाबदारी झटकण्यासाठी रुग्णांना सरसकट संदर्भसेवेसाठी पाठविण्यात येत आहे. त्यामुळे निष्क्रीय आरोग्य यंत्रणेत सुधारणा होणे आवश्यक आहे.
-लालसिंग भंडारी, कुसुमवेरी, ता.धडगाव
सकाळी नऊ वाजताच डॉक्टरांनी इलाज केल्यानंतर इंजेक्शन घेण्यासाठी तब्बल तीन तास परिचारिका न आल्यामुळे ताटकळत थांबावे लागले. त्यासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचा मनमानी कारभार चालू आहे.
-अरविंद वसावे, मोख खुर्द, ता.धडगाव
रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सुरळीत रहावी यासाठी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत. यापुढे अशा घटना घडू नये याची दक्षता घेण्यात येईल. हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल.
-डॉ.संतोष परमार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, धडगाव