नगरविकास विभागाच्या आदेशान्वये येथील पालिकेची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीला उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, गट नेते प्रा.मकरंद पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीसह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. पुढील सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक आनंदा पाटील यांनी केली. तसेच ट्रक टर्मिनलजवळ १५ मीटर रस्ता नागरिकांच्या सुविधेसाठी सोडावा, अशी मागणी नगरसेवक प्रशांत निकुंभे यांनी केली. बैठकीत ४३ विषयांवर चर्चा करण्यात आली. यात ठेकेदार विशाल गारोळे यांचा स्वच्छ भारत नागरी अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थापत्य कामाचा मक्ता रद्द करणे, शहरातील विविध चौकात वॉर ट्राफी रणगाडा बसविणे बाबत व जागा निश्चिती करणे, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत करावयाच्या कामासाठी सन २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरिता सध्या नियुक्ती ठेकेदार आस्था स्वयंरोजगार सेवा सह. संस्था धुळे यांचे मुदतवाढ मिळणे, भरकादेवी आईस्क्रीम ते बायपास रस्त्यावर होणारी अवजड वाहातूक थांबविणेकरिता बॅरिकेडिंग करणे, शहरातील पाटचारी लगत आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे, शहादा शहर पाणीपुरवठा योजनेचा सारंगखेडा येथील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे सारंगखेडा उपकेंद्रातून ११ केव्ही नवीन उच्च दाब वाहिनी टाकणे, पालिकेच्या स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनी यंत्रणा कार्यान्वित करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येऊन विषयांना मंजुरी देण्यात आली. विषय पत्रिकेचे वाचन वसुली अधिकारी सौंदाणे यांनी केले.
शहादा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ४३ विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 4:20 AM