धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील १९५ गावात दुष्काळ जाहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 11:42 AM2019-03-03T11:42:04+5:302019-03-03T11:42:21+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९५ गावांमध्ये दुष्काळ जाहिर करण्यात आला आहे़ ...
नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील ५० पैश्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या १९५ गावांमध्ये दुष्काळ जाहिर करण्यात आला आहे़ जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत़
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, नवापूर, नंदुरबार आणि तळोदा या चार तालुक्यात तसेच अक्कलकुवा तालुक्याच्या दोन मंडळात यापूर्वी दुष्काळ जाहिर करण्यात येऊन विविध सवलती लागू करण्यात आल्या होत्या़ महसूल विभागाकडून डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहिर झाल्यानंतर धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील गावांची पैैसेवारी ही ५० पैश्यांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले होते़ यामुळे तेथेही दुष्काळ घोषित करण्याची मागणी होती़ राज्यात ९३१ गावांमध्ये दुष्काळ घोषित झाला आहे़ यात दोन्ही तालुक्यातील १९५ गावांचा समावेश आहे़ अक्कलकुवा तालुक्यात मोलगी, डाब आणि वडफळी या तीन महसूल मंडळातील ९६ गावांचा तर धडगाव तालुक्यातील सर्व ९९ महसूली गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे़ यानुसार जमीन महसूलात सूट, कर्ज पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट यासह विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत़